राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांची घेतली मुलाखत; मलिक यांनी पुन्हा मोदी सरकारवर तोफ डागली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेतली आहे. मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यांची देशभरात चर्चा झाली होती. तसेच त्यांनी परखडपणे मोदी सरकार निवडणुकीपुर्वी पुन्हा अशी घटना घडवण्याची शक्यता वर्तवली होती. या मुलाखतीत राहुल गांधींनी मलिक यांना जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, गौतम अदानी आणि पुलवामा दहशतवादी हल्ला यावर प्रश्न विचारले. यावर उत्तरे देताना मलिक यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. ही मुलाखत यूट्यूब आणि ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला असून हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे.

सत्यपाल मलिक यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत राहुल गांधी यांनी त्यांना केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, या लोकांनी हल्ला केला असे मी म्हणणार नाही. पण या लोकांच्या निष्काळजीपणामुळे हे घडले आणि नंतर त्यांनी त्याचा राजकीय वापर केला. त्यांनी आपल्या भाषणात अनेकदा म्हटले होते की, तुम्ही मतदानाला जाताना पुलवामाची आठवण करा. यावर राहुल म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर शहीद जवानांचे मृतदेह विमानतळावर आणण्यात आले, तेव्हा आपणही तिथे गेलो होतो. यावेळी मला एका खोलीत बंद करण्यात आले. तिथे लष्कराचे अधिकारी आणि पंतप्रधानही येणार होते. अशावेळी त्यांनी मला एका खोलीत कोंडून ठेवले. असे वाटत होते जसे काही तिथे एखादा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्ला करताना सत्यपाल मलिक म्हणाले, जेव्हा पुलवामा हल्ला झाला तेव्हा ते नॅशनल कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. मी खूप वेळा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही. यानंतर मला संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता फोन आला तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आपल्या चुकीमुळे अनेकजण मारले गेले. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही आता गप्प बसा.पंतप्रधानांनी आपल्याला गप्प बसण्यास सांगितल्याचे मलिक म्हणाले. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण पंतप्रधान म्हणाले गप्प राहा.

सीआरपीएफचा अर्ज आम्हाला विमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आला होता. मात्र चार महिन्यांतह त्यावर निर्णय झाला नाही. पुलवामा हल्ल्यानंतर मी गेलो तेव्हा त्या ठिकाणी 8 ते 10 रस्ते मुख्य रस्त्याला जोडले होते. मात्र, त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हते. या मार्गाने सुरक्षा दलाचे वाहन जाते, त्यावेळी इतर वाहतूक काही काळ थांबवण्यात येते. असा नियम असताना या वाहनाला दुसर वाहन कसे धडकले. पुलवामा हल्ल्याच्या ठिकाणी गेल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. पण मी मोदींशी बोललो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही गप्प बसा. या लोकांना त्याचा निवडणुकीसाठी वापर करायचा होता. अनेकांनी मला सांगितले की स्फोटकांना धडक देणारे वाहन 10 ते 12 दिवसांपासून त्याच ठिकाणी फिरत होते.

राहुल गांधींनी मलिक यांना विचारले की तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये होतात. तेथील समस्येबद्दल तुमचे मत काय आहे? यावर सत्यपाल मलिक म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये तुम्ही लष्करासोबत काहीही करू शकत नाही, पण तेथील लोकांचा विश्वास जिंकून तुम्ही काहीही करू शकता. जम्मू-काश्मीरला तात्काळ राज्याचा दर्जा मिळायला हवा, असे त्यांनी संगितले. कलम 370 हटवण्यापेक्षा त्यांना राज्याच्या दर्जा काढण्याचे तेथील नागरिकांनी जास्त दुःख झाले. जेव्हा मी सरकारला राज्याचा दर्जा परत देण्यास सांगितले, तेव्हा ते म्हणाले की, हा दर्जा परत देण्याची गरज आहे का?, असेही मलिक यांनी सांगितले. यावर राहुल गांधी म्हणाले की, मी जम्मूला गेलो होतो तेव्हा मला जाणवले की तेथील लोक खूश नाहीत. तुमचाही तसाच अनुभव आहे.