गृहमंत्र्यांना इतिहासच माहीत नाही, नेहरूंवरील वक्तव्यावर राहुल गांधीचं प्रत्युत्तर

राज्यसभेत कलम 370बाबत माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमित शहा यांना इतिहास माहीतच नाही. फक्त मुद्दे भरकटवण्यासाठी शहा अशी विधानं करतात, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोमवारी राज्यसभेत पंडित नेहरूंवर टीका केली होती. पंडित नेहरू यांच्यामुळे POKची निर्मिती झाली. नेहरू यांनी केलेल्या दोन चुकांमुळे कश्मीर प्रश्न निर्माण झाला आणि तेथील लोकांना याची मोठी किंमत चुकवावी लागली, अस शहा यांनी याआधी म्हटले होते. त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे.

जवाहरलाल नेहरू यांनी आपलं सगळं आयुष्य देशासाठी वाहिलं. त्यासाठी अनेक वर्षं तुरुंगवास भोगला. अमित शहा यांना इतिहास माहीत नाही. त्यामुळे मुद्दे भरकटवण्यासाठीच ते इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न करत ते अशी विधानं करत आहेत. खरा मुद्दा जातीय जनगणनेचा आहे. पंतप्रधान ओबीसी वर्गातील आहेत, पण केंद्र सरकारमधील 90 सचिवांपैकी फक्त 3 ओबीसी प्रवर्गातील का आहेत? आम्ही ओबीसींचा टक्का आणि जातीय जनगणनेच्या मुद्दा धरून राहू, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत त्याचे स्वागत केले होते. त्याचवेळी काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेस कोणत्याही चांगल्या कामाचे समर्थन करत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या हातात आमच्या सरकारने लॅपटॉप दिले. इतिहास 370 चा निर्णय लक्षात ठेवेल. कलम 370 मुळे फुटीरतावादाला चालना मिळाली आणि त्यामुळेच दहशतवाद निर्माण झाला. आम्ही निवडणुका घेऊ आणि योग्य वेळी राज्याचा दर्जा देऊ, असेही ते म्हणाले होते.