धुमसत्या डम्पिंगमुळे उत्तन बनले गॅस चेंबर, 60 हजार रहिवाशांचा जीव घुसमटला

धुमसत्या डम्पिंगमुळे उत्तन गॅस चेंबर बनले आहे. या डम्पिंगमुळे मच्छीमारी, शेती व फळबागांची नासाडी झाली असून ६० हजार रहिवाशांचा जीव घुसमटला आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. त्यामुळे आरोग्यास धोकादायक असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार राजन विचारे यांनी प्रशासनाला दिला आहे.

शहरातून दररोज 550 टन ओला व सुका कचरा उत्तन प्रकल्पावर येतो. त्यामुळे सुमारे 60 हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर ठोस उपाययोजना करावी आणि हा प्रकल्प हटवावा यासाठी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा, भिवंडी माजी आमदार रुपेश म्हात्रे, विधानसभा संपर्कप्रमुख किरण फडणीस, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, शंकर विरकर, संदीप पाटील, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, बर्नड डिमेलो, हेलन बोर्जीस, प्रवीण पाटील, नीलम ढवण, जयंतीलाल पाटील, शहर संघटक तेजस्वी पाटील, युवा जिल्हाधिकारी पवन घरत, शिवसेना पदाधिकारी सेबी फर्नांडिस, लक्ष्मण कांदळगावकर, राजेश सिंह आदी उपस्थित होते.

आगी लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

भाईंदर पूर्वेतील झोपडपट्टी व कचरा प्रकल्पात आगी लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी खासदार विचारे यांनी आयुक्तांकडे केली. पालिकेने विकत घेतलेल्या वरसावे व वसईतील सकवार गावात हा प्रकल्प हलवावा. तसेच उत्तनला जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या बंद करा, अन्यथा शिवसेना नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार विचारे यांनी प्रशासनाला दिला आहे.
■ राजन विचारे, शिवसेना नेते, खासदार.

नागरिकांच्या आरोग्याबाबत तातडीने पावले उचलली जातील व त्याला पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. पुन्हा आग लागण्याच्या घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक वाढविण्याचे काम केले आहे.
– संजय काटकर पालिका आयुक्त