गद्दारांना गाडणार, निष्ठावंतांची मशाल! राजन विचारे हॅटट्रिक मारणार!! आदित्य ठाकरे यांचा ठाम विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळी नतमस्तक होऊन सकाळी भव्य रॅलीला सुरुवात झाली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रॅलीला उपस्थित राहिले. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राजन विचारे हॅटट्रिक मारणार असा ठाम विश्वास व्यक्त केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी सगळीकडे महाविकास आघाडीचा जोश दिसत असून लोकं आमच्यासोबत आहेत, असे म्हटले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या उल्लेखाचाही आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. बाहेरचे लोकं येणार आणि नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी कोण हे ठरवणार का? बाहेरच्या लोकांना बाहेरच ठेवणार असून त्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच राजन विचारे ठाण्यातून हॅटट्रिक मारणार असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे उपनेते विजय कदम, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, काँग्रेस राज्य उपाध्यक्ष मनोज शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, युवासेना कार्यकारणी सदस्य पवन जाधव, आपचे जिल्हाध्यक्ष अमर आमटे तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.