रामनिवास मलिक पुन्हा ‘मि. इंडिया’; महाराष्ट्राचा महेश पाटील उपविजेता

अत्यंत अटीतटीच्या पीळदार संघर्षात रेल्वे स्पोर्टस् प्रमोशन क्लबच्या (रेल्वे) रामनिवास मलिकने निलेश दगडे, महेश पाटील, मॅराडोना क्षेत्रीमयुम या एकापेक्षा एक शरीरसौष्ठवपटूंवर मात करत हिंदुस्थानी शरीरसौष्ठवपटू महासंघाच्या (आयबीबीएफ) 15व्या ‘भारत श्री’ स्पर्धेचे जेतेपद पुन्हा एकदा काबीज केले. या स्पर्धेत महाराष्ट्राचा महेश पाटील उपविजेता ठरला.

लुधियाना येथे पार पडलेल्या भारत श्री राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हिंदुस्थानातील दोनशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंनी आपला सहभाग नोंदविला असला तरी स्पर्धेवर रेल्वे आणि महाराष्ट्राच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसले.

रेल्वेच्या खेळाडूंनी 55, 65, 75, 80 आणि 90 ते 100 किलो अशा पाच गटांत सुवर्ण यश संपादत सांघिक जेतेपदही मिळवले, तर महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रे, पंचाक्षरी लोणार, महेश पाटील आणि निलेश दगडे या चौघांनी सोनेरी यश संपादले.

रामनिवासची अनुज तालियानवर मात
90 ते 100 किलो वजनी गटातच रामनिवास आणि अनुज तालियान हे दोन-दोन विजेते असल्यामुळे या गटात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. रामनिवासने 2019 साली ‘भारत श्री’ जेतेपद पटकावले होते, तर तालियाननेही गेल्या वर्षी हा मान मिळवला होता. त्यामुळे या गटाकडे साऱयांचेच लक्ष लागले होते आणि या संघर्षपूर्ण लढतीत रामनिवासने बाजी मारली. त्यामुळे जेतेपदाच्या लढतीतही तोच बाजी मारणार याचे संकेत तेव्हाच मिळाले होते. या स्पर्धेत रेल्वे, सेनादलासह नौदलातील खेळाडूही उतरले होते. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. माजी मि. युनिव्हर्स प्रेमचंद डेगरा, जागतिक महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे, हिंदुस्थानी महासंघाच्या हिरल सेठ यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.

15 व्या मि. इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल
55 किलो : 1. के. बालकृष्णा (रेल्वे), 2. पुंदन गोपे (झारखंड), 3. दीपेश भोईर (महाराष्ट्र); 60 किलो :1. नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), 2. नेता सिंग (मणिपूर), 3. जगेश दैत (महाराष्ट्र); 65 किलो : 1. विघ्नेशा (रेल्वे), 2. धीरज कुमार (कर्नाटक), 3. परीक्षित हजारिका (आसाम); 70 किलो :1. पंचाक्षरी लोणार (महाराष्ट्र), 2. प्रतीक पांचाळ (रेल्वे), 3. अमित भुयन (ओडिशा); 75 किलो : 1. के. हरीबाबू (रेल्वे), 2. संतोष शुक्ला (महाराष्ट्र), 3. नम्मी मरुनायडू (आंध्र प्रदेश); 80 किलो : 1. वी. जयप्रकाश (रेल्वे), 2. अश्विन शेट्टी (रेल्वे), 3. प्रकाश प्रधान (आसाम); 85 किलो : 1. महेश पाटील (महाराष्ट्र), 2. सरबो सिंग (रेल्वे), 3. डी. विघ्नेश (सेनादल); 90 किलो : 1. मॅराडोना क्षेत्रीमयुम (मणिपूर),2. आशुतोष साहा (हिंदुस्थानी पोस्ट), 3. अशफाक मोहम्मद (रेल्वे); 90-100 किलो : 1. रामनिवास मलिक (रेल्वे), 2. अनुज तालियान (उत्तर प्रदेश), 3. मुरली कुमार (सेनादल); 100 किलोवरील : 1. निलेश दगडे (महाराष्ट्र), 2. सुखदीप सिंग (पंजाब), राज कुमार (रेल्वे).
महिला शरीरसौष्ठव : 55 किलो 1. हर्षदा पवार (महाराष्ट्र), 2. सबिता बनिया (आसाम), 3. थोकचोम संजीता (मणिपूर); 55 किलोवरील : 1. इंगुदम कविता चानु (मणिपूर), 2. वंदना ठाकूर (मध्य प्रदेश), 3. बबिता (पंजाब).