4 दिवसांत 2 हजार 287 कोटी मालमत्ता कर वसुलीचे आव्हान

महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेली मालमत्ता करवसुली या वर्षी चांगलीच रखडली असून 31 मार्चअखेर म्हणजे अवघ्या चार दिवसांत तब्बल 2 हजार 287 कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान पालिकेसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे थकबाकीधारकांनी तातडीने मालमत्ता कर भरावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत यंदा मोठय़ा प्रमाणात घट निर्माण झाली आहे. मार्च अखेरपर्यंत 4,500 हजार कोटींचे लक्ष्य असताना 27 मार्च 2024 पर्यंत 2 हजार 213 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. नागरी विकासात मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत  सध्या करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठय़ा थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठीदेखील प्राधान्य देण्यात येत आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित चार दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

सुट्टीच्या दिवशीही कर भरण्याची सुविधा

n पालिका मुख्यालयासह 24 विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रांमध्ये कर भरण्याची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. n साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच 27 ते 30 मार्चदरम्यान पालिका मुख्यालयासह सर्व 24 प्रशासकीय विभागांमधील नागरी सुविधा केंद्र सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. n तर आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 31 मार्च 2024 रोजी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.