मुंबई पालिका आयुक्त चहल यांना हटवले; मिंधे सरकारला निवडणूक आयोगाचा दणका

केंद्रीय निवडणूक आयोगाने मिंधे सरकारला आज जोरदार चपराक दिली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना आयोगाने आज पदावरून हटवले. कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱयांची तातडीने बदली करा, असे आयोगाचे आदेश असूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली. चहल हे मिंधे सरकारच्या आदेशावर महापालिकेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करत होते. त्यांची गच्छंती हा मिंधे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

इक्बालसिंह चहल हे महाराष्ट्र केडरचे 1989च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे महानगरपालिका आयुक्त पदाचा कारभार सोपवण्यात आला होता. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर चहल हे महापालिकेचे प्रशासक बनले. मिंधे सरकारच्या आदेशावरून त्यांनी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली.

मिंधे सरकारच्या राजवटीत चहल यांच्या माध्यमातून मोठमोठे प्रकल्प मंजूर केले गेले. रस्ते घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, सौंदर्यीकरण घोटाळा यात चहल यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि रस्ते स्वच्छता मोहिमेसाठीही चहल यांनी हजारो कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली होती. आरोप होऊ लागल्यानंतर निविदा रद्द करून नव्याने निविदा काढल्याने ते वादग्रस्त ठरले होते.

सरकारचा प्रस्ताव फेटाळला

चहल यांच्यामार्फत मिंधे सरकारने महानगरपालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवीही मोडल्या. चहल यांच्या माध्यमातून मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राटे देऊन मिंधे सरकारने घोटाळे केले. त्यामुळे चहल यांनाच महापालिकेत कायम ठेवण्यासाठी सरकारने निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. सनदी अधिकारी मोठय़ा पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतले असून ते वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे कारण सरकारने दिले होते. परंतु सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळून लावला.

सहा राज्यांतील गृह सचिवांच्याही बदलीचे आदेश

निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमधील उच्चपदस्थ सनदी अधिकाऱयांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृह सचिवांना निवडणूक आयोगाने हटवले आहे. मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनाही आयोगाने पदावरून दूर केले आहे.

चहल यांच्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी करा!

इक्बालसिंह चहल यांना हटवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले आहे. सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबईच्या आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश दिले होते, तरीही मिंधे सरकार गप्पच राहिले. अखेर निवडणूक आयोगाने आज मुंबईच्या आयुक्तांना हटवले. उशीरच झाला, पण निदान योग्य निर्णय झाला. तरीही मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी केली जावी आणि जनतेच्या कराच्या पै अन् पैचा हिशेब केला जावा, अशी आमची मागणी आहे,’’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.