सामना अग्रलेख – कोरोनाचे शुक्लकाष्ठ

‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटच्या रूपात कोरोनाचे शुक्लकाष्ठ पुन्हा एकदा मागे लागले आहे आणि मायबाप सरकार मात्र निवडणूक व्यवस्थापनात मश्गुल आहे. कोरोनाच्या वाढत्या गतीपेक्षाही सरकारला सत्तेची फिकीर आहे. गावोगाव पंतप्रधानांचे फोटो मिरवत प्रचारयात्रा सुरू आहे. कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढवित सुटले आहेत आणि त्यापुढे निप्रभ दिसणारे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या कामात रमले आहे. ‘कोरोना जोमात व सरकार कोमात’ अशी ही अवस्था आहे. कोविडच्या नवीन संकटापासून वाचवण्यासाठी जनतेला कोणी वाली आहे काय?

महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका वाढत असतानाच कोरोनाच्या संकटानेही पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तापमानाचा पारा खाली उतरल्यामुळे देशभरातच कोविडच्या विषाणूंसारखे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यात कोविड – 19 या विषाणूच्या जेएन-1 या नवीन व्हेरियंटने आपल्या देशातही वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात दर तासाला सरासरी 29 जणांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या रुग्णवाढीची ही गती धोकादायक आहे. मात्र राज्य सरकारांसह केंद्रीय सरकार व सत्तारूढ पक्षाला निवडणूक ज्वराने झपाटले आहे. सरकारपक्षच पूर्णवेळ ‘जोड-तोड तांबा-पितळ’च्या नसत्या उद्योगात रमल्यामुळे प्रशासनाच्या पातळीवरही सगळाच आनंदी आनंद आहे. सत्तारूढ पक्षाचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे तमाम नेते ज्या पद्धतीने 24 तास इलेक्शन मोडवर आहेत ते पाहता प्रचंड वेगाने पसरत चाललेल्या कोविडच्या नव्या संकटाकडे लक्ष देण्यास या नेतेमंडळींकडे फुरसत आहे तरी कुठे? नाही म्हणायला आठवडाभरापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सतर्कतेचा इशारा दिला. तथापि, ही औपचारिकता वगळता वेगाने फैलावणारे संक्रमण रोखण्यासाठी कुठलीही ठोस पावले सरकारने उचललेली दिसत नाहीत. जेएन-1 या नव्या कोविड विषाणूने देशाच्या अनेक राज्यांत थैमान घातले आहे. या विषाणूचे गुरुवारी एकाच दिवसात 797 नवीन रुग्ण देशभरात आढळले व गेल्या 24 तासांत कोरोनामुळे

सहा जणांचा मृत्यू

झाला. यापैकी 2 जण केरळमध्ये, तर महाराष्ट्र, तामीळनाडू, प. बंगाल व पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एक जण दगावला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटून दोन आकडी संख्येवर आली असताना गेल्या 20 दिवसांत सक्रिय झालेल्या कोविडच्या नवीन विषाणूमुळे कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू झाला. एक आठवड्यापूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येने अचानक उसळी घेतली. 21 डिसेंबर रोजी एकाच दिवशी 594 नवीन रुग्णांची नोंद झाली व सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 311 वर जाऊन पोहोचली. मागच्या आठवडाभरात कोरोनाचे हे संक्रमण दुपटीने वाढून देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 4 हजार 91 इतकी नोंदवली गेली. त्यातच जेएन-1 या कोविडच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातल्यामुळे आरोग्य यंत्रणांची झोप उडाली आहे. नवा व्हेरियंट जीवघेणा व धोकादायक नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात असले तरी गुरुवारी एकाच दिवसात झालेले 6 मृत्यू जनतेला नक्कीच काळजीत टाकणारे आहेत. एकट्या केरळमध्ये जेएन-1 या नव्या व्हेरियंटचे 78 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 34, गोव्यात 18, कर्नाटकात 8 तर महाराष्ट्रात 7 रुग्ण सापडले. राजस्थानात 5, तामीळनाडू 4, तेलंगणा 2, तर दिल्लीमध्ये जेएन-1 या नव्या व्हेरियंटच्या एका

रुग्णाची नोंद

झाली. देशातील प्रत्येकच राज्यात सर्दी, पडसे, खोकला व तापाची साथ पसरली आहे. तपासणी केली तर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येईल, या भयाने बहुतांश लोक चाचणीच करत नसल्याने आजघडीला समोर येत असलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी फसवी असण्याचीच शक्यता अधिक आहे. प्रत्यक्षात चाचणीअभावी नोंद न झालेले किती कोविड रुग्ण देशात सक्रिय आहेत व त्यांच्यामार्फत कोरोनाचे हे संकट आणखी किती फैलावत जाईल, हे सांगणे कठीण आहे. 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या भयंकर संकटाने तब्बल दोन वर्षे देशभर उच्छाद मांडला होता. 5 लाख 30 हजारांहून अधिक लोक कोरोनामुळे देशभरात मृत्युमुखी पडले. प्रारंभिक काळात केलेले दुर्लक्ष व जनतेच्या सुरक्षेपेक्षाही राजकारण व निवडणूक सभांना दिलेले महत्त्व यामुळेच कोरोनाचे संक्रमण झपाटय़ाने वाढले. आताही तेच घडते आहे. ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटच्या रूपात कोरोनाचे शुक्लकाष्ठ पुन्हा एकदा मागे लागले आहे आणि मायबाप सरकार मात्र निवडणूक व्यवस्थापनात मश्गुल आहे. कोरोनाच्या वाढत्या गतीपेक्षाही सरकारला सत्तेची फिकीर आहे. गावोगाव पंतप्रधानांचे फोटो मिरवत प्रचारयात्रा सुरू आहे. कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढवीत सुटले आहेत आणि त्यापुढे निप्रभ दिसणारे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या कामात रमले आहे. ‘कोरोना जोमात व सरकार कोमात’ अशी ही अवस्था आहे. कोविडच्या नवीन संकटापासून वाचवण्यासाठी जनतेला कोणी वाली आहे काय?