सामना अग्रलेख – धारावीचा लढा! अदानींसाठी भाजप असा घायाळ का होत आहे?

धारावीचा लढा हा मुंबई वाचविण्याचा लढा आहे. भांडवलदारांच्या छातीवर पाय ठेवून मुंबई महाराष्ट्रात सामील करून घेतली ती मुंबई पुन्हा भांडवलदारांची दासी कदापि होऊ देणार नाही. हा मराठी बाणा कायम आहे. ‘मुंबई’ दासी व्हावी म्हणून अदानी यांनी एकनाथ मिंधे, अजित पवार यांच्यासह पन्नासएक आमदार-खासदारांना आधी पायाचे दास किंवा पायपुसणे करून घेतले. पण तरीही लाखोंचा मोर्चा धारावी-मुंबई वाचविण्यासाठी निघाला. यात भाजपच्या बेंबीत विंचवाने डंख मारावा असे काय आहे? लढाई अदानींविरुद्ध आहे, घायाळ भाजप झाला आहे. भाजपची जान अदानींच्या पोपटात आहे काय?

गौतम अदानी यांच्याशी भारतीय जनता पक्षाचे नेमके नाते काय हे त्यांनी एकदा जाहीर केले पाहिजे. या नात्याविषयी लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. हे नाते नैतिक की अनैतिक यावरही खुलासा व्हायला हवा. हे महाशय टाटा, बिर्ला, बजाज, अझिझ प्रेमजी, नारायण मूर्ती नाहीत. उद्योगपती व शेठजी यात फरक आहे. अदानी हे मोदीकृत भाजपचे नाजूक जागेचे दुखणे असावे हे तर नक्कीच. कारण विरोधकांनी अदानी यांच्या एखाद्या उपद्व्यापाबाबत प्रश्न उपस्थित करताच भाजपचे तांडव सुरू होते. त्यांच्या अंगात आग्यावेताळ संचारतो व प्रश्नकर्त्यांच्या अंगावर ते हमरीतुमरी करत धावून जातात. हेच आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबतीतही दिसून आले. धारावी पुनर्वसन विकासकामाचे ‘टेंडर’ अदानी यांच्या पंपनीने मिळवले आहे. आशियामधील सगळय़ात मोठय़ा घनदाट झोपडपट्टीचा विकास होत असेल व गोरगरीबांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार असतील तर त्यास कोण विरोध करेल? विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही. पण साधारण सहाशे एकरांचा भूखंड अदानी यांच्या आधीच फुगलेल्या खिशात घालताना मिंधे-फडणवीस सरकारने अदानींशी एक प्रकारे ‘मुंबई’चाच सौदा केला. धारावी विकासाच्या नावाखाली संपूर्ण मुंबईच ‘हुंडा’ म्हणून या भाजपच्या जावयास देण्याचा घाट घातला. याविरोधात शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले व धारावीकरांच्या हक्कासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी एक विराट मोर्चा काढताच भाजपच्या भांडवलदारी उपऱयांनी थयथयाट सुरू केला. अदानींना मुंबई गिळू देणार नाही असा दम भरताच भाजपवाले अदानींचे वकील म्हणून भांडण्यास उभे राहिले. त्यामुळेच प्रश्न पडला अदानींचे भाजपशी नाते काय आहे? धारावीतील साधारण बारा लाख लोकांना घरे मिळावीत, पण त्यातील नागरिकांना पात्र-अपात्र ठरविण्याचा अधिकार पूर्णपणे अदानींचा आहे. 300 चौरस फुटांचे घर अदानी देणार, पण त्यांना 500 चौरस फुटांचे घर मिळायला हवे. धारावीत गार्मेंट, चर्मोद्योग, प्लॅस्टिक, कुंभारकामाचे उद्योग आहेत. हे तसे लघुउद्योग आहेत. खाद्यपदार्थ, पापड-लोणची बनवणाऱया महिलांचे गट तेथे काम करतात. त्या सगळय़ांच्या व्यवसायांना ते

आहेत तेथेच जागा

मिळायला हव्यात ही मागणी न्याय्य आहे व या मागणीबद्दल आवाज उठवताच भाजप आणि त्यांचे मिंधे लोक अदानींचा जयजयकार करीत तांडव करीत आहेत. या प्रकल्पातून अदानींना किमान एक लाख कोटींचा फायदा होईल. कारण धारावी ही धारावी नसून बीकेसी म्हणजे सगळय़ात महागडय़ा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सचाच विस्तारित भाग होईल व धारावीच्या जमिनीला देशात सर्वोच्च भाव मिळेल. पुन्हा धारावीच्या निमित्ताने सरकारने अदानींवर सवलती व करमाफीचा वर्षाव केला आहे. जणू काही धारावी प्रकल्पाचे काम ते फुकटात किंवा धर्मादाय पद्धतीने करणार आहेत. ‘टीडीआर’ धारावीतल्या गटारापासून जिन्याखालच्या जमिनीचा मिळेल व कोटीकोटींचा हा ‘टीडीआर’ अदानी मुंबईत कोठेही वापरू शकतात आणि हव्या त्या भावात विकून मुंबईतील घरांच्या किमतीवर नियंत्रण ठेवू शकतात. हा ‘टीडीआर’ घोटाळा धक्कादायक आहे. धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली वडाळय़ाच्या तसेच कांजुरमार्गच्या मिठागराची जमीनही अदानी यांच्या घशात जात आहे. देवनार कत्तलखान्याची 300 एकर जमीन अदानी यांनाच देण्याचा घाट घातला आहे. मुंबईतील अभ्युदयनगर, वरळीच्या आदर्शनगरचे शेकडो एकरांचे भूखंड विकासाच्या नावाखाली अदानी यांनी आधीच कब्जात घेतले आहेत. उद्या रेसकोर्स, श्sिावतीर्थ, कामगार मैदानसुद्धा त्यांच्या खिशात कोंबले जाईल. एक प्रकारे मुंबईचा सातबारा भाजपच्या जावयाच्या नावावर करण्याचे हे कुटिल कारस्थान असून शिवसेना मुंबईची ही लूट उघडय़ा डोळय़ांनी पाहू शकत नाही. मराठी पाटय़ांवर आंदोलन करणाऱया, टोलवर तोडफोड करणाऱया व त्यानिमित्त मराठीचा गजर करणाऱया पक्ष व संघटना येथे पायलीला पन्नास आहेत, पण या सगळय़ांच्या तोंडास अदानींनी आता बूच मारले आहे. धारावी प्रकल्पातील अदानी भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना, काँग्रेस, डावे, राष्ट्रवादी काँग्रेसवाले एकवटले. प्रचंड मोर्चा निघाला तेव्हा सगळय़ांनाच संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाची आठवण झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा प्रामुख्याने मुंबईसाठीचा लढा होता. उपऱयांना मुंबईची लूट करायची होती व त्यासाठी त्यांना

महाराष्ट्रातून मुंबई वेगळी

करायची होती. मुंबईला भांडवलदारांच्या पायाची दासी बनवून तिचे वस्त्रहरण करायचे होते. त्याविरुद्ध मराठा एकवटला व मुंबईचे रक्षण झाले. त्या लढय़ात भाजप किंवा जनसंघ कोठेच नव्हता. मात्र मुंबईच्या मलिदय़ावर ताव मारणारी शेठगिरी करण्यात ते सदैव पुढेच आहेत. अदानींचा इतका पुळका या लोकांना का? मोदी-शहांच्या भाजप सरकारने देशाची सार्वजनिक संपत्ती विकायला काढली व ती विकत घेणारे एकमेव नाव म्हणजे अदानी. विमानतळे, सार्वजनिक उपक्रम, बंदरे, रस्ते, सरकारी जमिनी, वृत्तसंस्था या सगळय़ांवर भाजपपुरस्कृत भांडवलदार अदानी यांनी कब्जा मिळवला आहे. त्यात आता धारावी झोपडपट्टीची भर पडली. दिल्लीत दोघे विकायला बसलेत व तो माल दोघे खरेदी करतात. त्यात अदानी यांचा वाटा मोठा आहे. यावर कोणी आवाज उठवला की, भारतीय जनता पक्षाला मिरच्या झोंबतात व ते सगळे ताडताड उडतात. अदानी यांच्या उपद्व्यापावर प्रश्न विचारणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत सातत्याने अदानी यांच्या कारनाम्यावर प्रश्न विचारले. त्यामुळे भाजप इतकी खवळली की, येनकेनप्रकारेण त्यांनी महुआ यांना संसदेतूनच बाहेर फेकून दिले. आता धारावीवर प्रश्न विचारणाऱयांना भाजपवाले सुळावर चढवतात की, फासावर लटकवतात तेच पाहायला हवे. पण धारावीची जनता लढाऊ बाण्याची आहे. धारावीचा लढा हा मुंबई वाचविण्याचा लढा आहे. भांडवलदारांच्या छातीवर पाय ठेवून मुंबई महाराष्ट्रात सामील करून घेतली ती मुंबई पुन्हा भांडवलदारांची दासी कदापि होऊ देणार नाही. हा मराठी बाणा कायम आहे. ‘मुंबई’ दासी व्हावी म्हणून अदानी यांनी एकनाथ मिंधे, अजित पवार यांच्यासह पन्नासएक आमदार-खासदारांना आधी पायाचे दास किंवा पायपुसणे करून घेतले. पण तरीही लाखोंचा मोर्चा धारावी-मुंबई वाचविण्यासाठी निघाला. यात भाजपच्या बेंबीत विंचवाने डंख मारावा असे काय आहे? लढाई अदानींविरुद्ध आहे, घायाळ भाजप झाला आहे. भाजपची जान अदानींच्या पोपटात आहे काय?