सामना अग्रलेख – कृष्ण हवाच आहे!

कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने महिलेच्या वस्त्रहरणावरून स्थानिक पोलीस आणि समाजाचे कान टोचले असले तरी केवळ महिला सन्मानाचेच नव्हे, तर आज देशात लोकशाहीचे राजरोस वस्त्रहरण होत आहे. सरकारविरुद्ध उठणारे आवाज तुरुंगात डांबले जात आहेत. अत्याचाराला तोंड देणाऱ्या पीडित महिला व देशाची लोकशाही यांची अवस्था समान झाली आहे. महाभारतातील द्रौपदीने टाहो फोडला व धावून आलेल्या कृष्णाने तिचे लज्जारक्षण केले. आज आपल्या देशातील लोकशाही आणि घटनात्मक अधिकारदेखील असाच लज्जारक्षणासाठी टाहो फोडत आहेत. देशालाही एक कृष्ण हवाच आहे!

महिलांचे सशक्तीकरण, महिलांचे सक्षमीकरण वगैरे भारदस्त शब्दांचा आपल्या देशात कायमच जप सुरू असतो; महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नवनवीन कायदेही आणले जातात, पण स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना मात्र काही केल्या थांबत नाहीत. देशात रोज कुठे ना कुठे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत आणि सरकारेच नव्हे, तर समाजही सरावल्यागत या घटनांकडे मख्खपणे पाहात आहे. कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने महिला अत्याचाराच्या एका प्रकरणात नेमके यावरच बोट ठेवले आहे. कर्नाटकच्या बेळगावातील एका महिला अत्याचार प्रकरणाची स्वतःहून दखल घेताना उच्च न्यायालयाने ‘हे जग दुर्योधनांचं व दुःशासनांचं आहे,’ अशी उद्विग्नता व्यक्त केली व ती चुकीची नाही. बेळगावात एका तरुणीने आपल्या साखरपुडय़ाच्याच दिवशी कुटुंबीयांनी ठरवलेले लग्न झुगारून गावातीलच आपल्या प्रियकरासोबत पलायन केले. त्यामुळे संतापलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी संबंधित तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या आईला बेदम मारहाण केली. घराबाहेर खेचून या महिलेला निर्वस्त्र करण्यात आले आणि नग्नावस्थेतच या महिलेची धिंड काढण्यात आली व याच अवस्थेत एका विजेच्या खांबाला तब्बल 2 तास या महिलेला बांधून ठेवण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडत असताना ना तिथे पोलिसांनी धाव घेतली, ना शेजारी-पाजारी वा रस्त्यावरील कोणीही या विकृत कृत्याला रोखण्याचा प्रयत्न केला. या

संतापजनक घटनेचे

वार्तांकन प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली व स्थानिक पोलीस यंत्रणेची कडक शब्दांत कानउघाडणी केली. न्या. प्रसन्न वराळे व न्या. कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठाने प्रशासनाबरोबरच समाजावरही संतप्त ताशेरे ओढले. ‘पुराणकाळात द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू असताना तिच्या लज्जारक्षणासाठी भगवान श्रीकृष्ण धावून आले होते; पण सध्याच्या या आधुनिक युगात एवढे भयंकर अत्याचार होत असताना या महिलेच्या मदतीसाठी कुणीही धावून आले नाही. दुर्दैवाने हे जग दुर्योधन व दुःशासनांचे आहे!’ अशा कडक शब्दांत न्यायमूर्तींनी आपली चीड व्यक्त केली. अर्थात, ही घटना जरी कर्नाटकातील असली तरी देशाच्या अनेक राज्यांत अशा प्रकारच्या घटना या नित्याच्याच झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मणिपुरातही दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. कुठल्या तरी वांशिक उन्मादातून बेभान झालेला जमाव भररस्त्यात महिलांच्या अंगावरील वस्त्र फाडून टाकतो… नग्नावस्थेत त्यांना शहरभर फिरवले जाते… जमावातील काही जण त्याचे व्हिडीओ चित्रणही करतात आणि तब्बल 80 दिवस या प्रकरणाची कुठेच वाच्यता होत नाही. सरकार व प्रशासन सारे काही ठाऊक असतानाही मूग गिळून गप्प बसते. प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर

सरकारचे बिंग

फुटते, तरी प्रशासन काहीच कारवाई करत नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो. ‘तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही कारवाई करू!’ असा सज्जड दम सुप्रीम कोर्टाने भरल्यानंतर आरोपींवर कारवाई होते. या व अशा घटनांमुळेच सध्याचे जग दुर्योधन व दुःशासनांचे आहे, अशी चीड कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने व्यक्त केली असेल तर त्यात गैर काहीच नाही. मध्यंतरी महाराष्ट्रात बीडच्या वाळुंज गावातही जमिनीच्या वादातून एका महिलेची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. राजस्थान, उत्तर प्रदेश, प. बंगाल, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांतूनही महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटना घडतच असतात. कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने महिलेच्या वस्त्रहरणावरून स्थानिक पोलीस आणि समाजाचे कान टोचले असले तरी केवळ महिला सन्मानाचेच नव्हे, तर आज देशात लोकशाहीचे, देशातील घटनात्मक संस्था आणि पदांचे राजरोसपणे वस्त्रहरण होत आहे. सरकारविरुद्ध उठणारे आवाज तुरुंगात डांबले जात आहेत. अत्याचाराला तोंड देणाऱया पीडित महिला व देशाची लोकशाही यांची अवस्था समान झाली आहे. महाभारतातील द्रौपदीने टाहो फोडला व धावून आलेल्या कृष्णाने तिचे लज्जारक्षण केले. आज आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकारदेखील असाच लज्जारक्षणासाठी टाहो फोडत आहेत. देशालाही आज एक कृष्ण हवाच आहे!