सामना अग्रलेख – तुतारी फुंकावीच लागेल!

विद्यमान राज्यकर्त्यांनी सरत्या वर्षांत जनतेसमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न उभे करून ठेवले आहेत. त्याचा जाब उगवत्या वर्षात विचारावाच लागेल. मावळत्या वर्षातील जुनी जळमटे फेकून महाराष्ट्रात आणि देशात नवीन घडविण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास घेऊनच नवीन वर्षात सर्वांना वाटचाल करावी लागेल. केशवसुतांनी सांगितल्याप्रमाणे नवीन तुतारी देशाला फुंकावीच लागेल!

ज 1 जानेवारी. नवीन वर्षाचा पहिला दिवस! रविवारी म्हणजे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जगभरातील जनतेने 2023 च्या मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे आनंदाने व जल्लोषात स्वागत केले. 2024 या नवीन वर्षाचे डौलात आगमन झाले. मावळत्या वर्षात काय अप्रिय घडले, कोणती दुःखे वाटय़ाला आली, या जमा-खर्चाचा हिशेब न मांडता नवीन वर्षात नक्कीच काहीतरी चांगले घडेल, असा दुर्दम्य आशावाद उराशी बाळगून सामान्य माणूस दरवर्षीच नवीन वर्षाचे मनापासून स्वागत करीत असतो. 2023 ची शेवटची रात्रही याला अपवाद नव्हती. गाव-खेडय़ांपासून महानगरांपर्यंत सगळीकडेच नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत झाले. घरोघरी, सोसायटय़ांमध्ये थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ा रंगल्या होत्या. संकटे, प्रश्न, अडचणी, समस्या हे तर माणसाच्या पाचवीलाच पुजलेले आहे. म्हणून काही माणूस जगण्याचे सोडत नाही. आनंदाचे क्षण मोजके असले तरी त्याचे पुनः पुन्हा बारसे करत माणूस सुखाचे सोहळे करण्याचा एकही प्रसंग सोडत नाही. जुनं विसरून पुढे जायचा प्रयत्न माणूस करीत असतो.

जुने जाऊ द्या  मरणालागुनी,
जाळुनी किंवा पुरुनी टाका,
सडत एक्या ठायी ठाका,
सावध! ऐका पुढल्या हाका…’

कविश्रेष्ठ केशवसुतांनी ‘तुतारी’ या आपल्या सुप्रसिद्ध कवितेत हेच तर सांगितले आहे. मावळत्या वर्षातील जे काही शल्य असेल ते विसरून नव्या वर्षात नावीन्याची तुतारी फुंकता आली पाहिजे. मावळत्या वर्षात अनेक बऱ्या-वाईट गोष्टी घडल्या. एप्रिल 2023 मध्ये

लोकसंख्येच्या बाबतीत

हिंदुस्थानने चीनला मागे टाकले. जवळपास शतकभर लोकसंख्येच्या क्रमवारीत चीन पहिल्या क्रमांकावर होता. मात्र 143 कोटी लोकसंख्येचा हा टप्पा ओलांडून हिंदुस्थान हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले. चंद्राच्या दक्षिण धुवावर ‘चांद्रयान-3’ने यशस्वी लॅण्डिंग करून जो इतिहास घडवला ती हिंदुस्थानच्या शास्त्रज्ञांनी देशवासीयांना दिलेली 2023 मधील सर्वात मोठी भेट होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता रशिया व युक्रेन आणि त्यानंतर इस्रायल व हमास यांच्यात भडकलेल्या युद्धात सुरू असलेला नरसंहार कुठल्याही संवेदनशील मनाला सुन्न करणारा आहे. दुर्दैवाने मावळत्या वर्षाअखेर त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. नवीन वर्षात तरी हे युद्ध आणि रोजचे मृत्यू थांबायला हवेत. हिंदुस्थानपुरते बोलायचे तर मावळत्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राममंदिराच्या उद्घाटनावरून मोठी राजकीय वातावरण निर्मिती करण्यात आली. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन होत आहे. मात्र हा सोहळा भक्तिभावापेक्षा राजकीय इव्हेंटमध्येच अधिक अडकला आहे. अयोध्येत राममंदिर होतेय, हा देशभरातील तमाम हिंदूंसाठी नक्कीच अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. मात्र रामनामाचा जप केवळ राजकारणासाठी करायचा आणि रामराज्याच्या संकल्पनेला मात्र तिलांजली द्यायची, हे योग्य नाही. मणिपूरमध्ये भररस्त्यावर झालेली महिलांची विटंबना राज्यकर्ते उघडय़ा डोळय़ांनी पाहत राहिले. ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाविरुद्ध आंदोलन पुकारले. या दोन्ही घटनांवर राज्यकर्त्यांनी ‘ब्र’ही उच्चारला नाही.

सरकारचे हे मौन

रामराज्याच्या कुठल्या संकल्पनेत बसते? सरकारविरुद्ध बोलणारे आवाज तुरुंगात डांबायचे, भ्रष्टाचारी नेत्यांना सरकारी यंत्रणांचा धाकदपटशा दाखवून सरकार पक्षात सामील करून घ्यायचे, असे अनेक प्रकार मावळत्या वर्षाने पाहिले. नवीन वर्षात तर सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे  येत्या तीन-चार महिन्यांत या प्रकारांना अधिकच ऊत येईल. 2023 संपण्यापूर्वी पाच राज्यांत विधानसभांच्या निवडणुका झाल्या. यातील मिझोराम वगळता चारपैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन  राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली, तर तेलंगणात काँग्रेसने विजय मिळवला. या निकालानंतर जणू काही लोकसभा निवडणूकच जिंकली, या भ्रमात केंद्रातील राज्यकर्ते वावरत आहेत. प्रत्यक्षात या चार राज्यांमध्ये पडलेली एकूण मतांची गोळाबेरीज बघता काँग्रेसला 4 कोटी 90 लाख 69 हजार 462, तर भाजपला 4 कोटी 81 लाख 29 हजार 325 इतकी मते मिळाली. काँग्रेसला भाजपपेक्षा 9 लाख 40 हजार 137 मते अधिक मिळाली आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपसमोर इंडिया आघाडीने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर 2022 व 23 ही दोन्ही वर्षे ‘धोक्या’ची व ‘खोक्यां’ची राहिली. घटनाबाहय़ सत्तांतर होऊनही ते सरकार मावळत्या वर्षात कायम राहिले. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कदाचित हे ‘ईडी’ सरकार जाईलही; पण लोकशाहीचे जे वस्त्रहरण व धिंडवडे जनतेला बघावे लागले, त्याचे काय? विद्यमान राज्यकर्त्यांनी सरत्या वर्षांत जनतेसमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न उभे करून ठेवले आहेत. त्याचा जाब उगवत्या वर्षात विचारावाच लागेल. मावळत्या वर्षातील जुनी जळमटे फेकून महाराष्ट्रात आणि देशात नवीन घडविण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास घेऊनच नवीन वर्षात सर्वांना वाटचाल करावी लागेल. केशवसुतांनी सांगितल्याप्रमाणे नवीन तुतारी देशाला फुंकावीच लागेल!