‘सडेतोड’मधून युवासेनेचे विचार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार

युवासेनेच्या वतीने आयोजित ‘सडेतोड’ या राज्यस्तरीय वक्तत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला तुफान प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून सुमारे पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 13 विविध पेंद्रांतून अंतिम फेरीकरिता 45 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. आता या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार, 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत शिवसेना भवन, दादर येथे होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे वक्ते प्रचार, प्रसार आणि युवासेनेचे विचार हे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणार आणि महाराष्ट्रात बदल घडविण्यासाठी सज्ज होणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘सडेतोड’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सडेतोड’ या स्पर्धेमुळे शिवसेनेला चांगले वक्ते मिळाले, त्यांनी चौकसभा गाजवल्या. प्रवक्ते मिळाले त्यांनी प्रसारमाध्यमांवर शिवसेनेची भूमिका मांडली आणि शिवसेनेचे विचार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविले. ‘सडेतोड’ या स्पर्धेची प्राथमिक फेरी 27 ऑगस्ट रोजी पार पडली. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. आता या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवारी होणार आहे. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते अमोल कीर्तिकर, प्रवक्ते लक्ष्मण हाके, आमदार विलास पोतनीस, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि ‘साम न्यूज’च्या ब्युरो चीफ रश्मी पुराणिक यांची साथ लाभणार आहे.