बुलढाण्यात संजय गायकवाडांचा ‘प्रताप’, लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांना धक्का देत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावरून मिंधे गटात मोठी खळबळ उडाली आहे. लातूर आणि धाराशिव मतदारसंघाच्या उमदेवारीवरूनही महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जुंपली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मिंधे गटात मोठी बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.

संजय गायकवाड यांनी एक नव्हे तर दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. एक उमेदवारी अर्ज पक्षाकडून, तर दुसरा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर संजय गायकवाड यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. अर्ज मागे घेण्यासाठी भरला जात नाही, असे विधान गायकवाड यांनी केले आहे. यामुळे गायकवाड यांची उमेदवारी ही निश्चित असल्याची चर्चा सुरू आहे.

अचानक घडलेल्या या राजकीय नाट्यानंतर प्रतापराव जाधव यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय गायकवाड यांनी अर्ज का भरला माहिती नाही. कदाचित त्यांना एबी फॉर्म मिळावा असावा, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.

एकीकडे संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर प्रतापराव जाधव यांनी आपला दावा कायम ठेवला आहे. यामुळे लोकसभेच्या उमेदवारीवरून मिंधे गटात राडा होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, बुलढाण्याबरोबर धाराशिव आणि लातूर मतदारसंघावरूनही महायुतीत खडाखडी सुरू झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात मिंधे गटाला उमेदवार मिळत नाहीय. मिंधे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी यासाठी आपल्या भावाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे राणी जगजितसिंह पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचे वृत्त आहे.