“जो माणूस स्वत:च्या घरातील मंगळसुत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही, त्याने…”, संजय राऊत यांचा मोदींवर हल्लाबोल

जो माणूस स्वत:च्या घरातील मंगळसुत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसुत्रांची उठाठेव करू नये, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. राजस्थानमधील सभेमध्ये मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेस आई-बहिणींचे मंगळसूत्रही शिल्लक ठेवणार नाही, अशी टीका मोदींनी केली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला खासदार राऊत उत्तर देत होते.

काँग्रेसच्या नाही तर मोदींच्याच राज्यात बायकांची मंगळसूत्र गहाण पडली, लुटली गेली. मोदींनी आणलेल्या नोटबंदीमुळे लाखो महिलांना मंगळसूत्र गहाण ठेऊन घरं चालवावी लागली. लॉकडाऊनमुळे हजारो, लाखोंचा रोजगार गेला. त्या काळात महिलांना मंगळसूत्र विकून घरंच चालवावी लागली. बेरोजगार तरुणांच्या मतांना मंगळसूत्र गहाण ठेवावा लागले. मणिपूरमध्ये किती महिलांची मंगळसूत्र गेली? जंतरमंतरवर महिला खेळाडूंच्या मंगळसुत्रावर हात टाकण्यात आला. हे मोदींना आठवत नाही का? या सगळ्याला मोदी जबाबदार असून देशात महिलांच्या मंगळसुत्रावर मोदींमुळे गडांतर आले, असा घणाघात राऊत यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या अमित शहा यांचाही खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. देशात काँग्रेसचे राज्य असताना शिवसेना राम मंदिर आंदोलनात उतरली. त्यावेळी अमित शहा आणि त्यांची लोकं पार्श्वभागाला पाय लावून पळाले हे सगळ्यांना माहिती आहे. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायलाही हे तयार नव्हते. शहांच्या पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांनी या घटनेशी भाजपचा संबंध नसून शिवसेनेने केले असावे असे म्हटले. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्भयपणे सांगितले की, जर हे कृत्य शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. तेव्हा अमित शहा कुठे होते? राजकारणात तरी होते का? असा सवाल करत गोध्राकांड करण्याइतके अयोध्याकांड सोपे नव्हते, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी निवडणूक हरणार असून 4 जूननंतर मोदींचा पक्ष सत्तेत राहणार नाही. देशात जवळपास 70 वर्षांपैकी 50 वर्ष काँग्रेसचे पंतप्रधान राहिले. पंडित नेहरू, लाल बहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव असे सर्वोत्तम पंतप्रधान देशाला लाभले. या सर्व पंतप्रधानांनी देश बनवला, तो विकण्याचे आणि लिलाव करण्याचे काम मोदी करत आहेत. तसेच शिंदे आणि अजित पवार गटाचाही एकही खासदार निवडून येणार नाही. 4 जूननंतर शिंदे गट आणि अजित पवार गट राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेष झालेले असतील, असा दावाही खासदार राऊत यांनी केला.

मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं? हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल

दरम्यान, सांगलीतून विशाल पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्या पहेलवानाशी लढत द्यायला एक उमेदवार कमी पडतोय म्हणून भाजपने तिथे दोन उमेदवार ठेवले आहेत. यामागे कोणाची प्रेरणा, ताकद आहे हे योग्य वेळी बोलूच. हे भाजपचे कारस्थान असून त्यांच्यासाठी सांगलीची निवडणूक सोपी नाही. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना लोकांचा पाठिंबा मिळतोय. त्यामुळे घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपने अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार मैदानात आणल्याची शंका लोकांच्या मनात आहे.

माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचे बलिदान दिले! प्रियांका गांधी यांचा मोदींवर हल्ला