बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास भाजपला 33 कोटी देवही वाचवू शकणार नाहीत!

भाजप मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास का घाबरत आहे, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीविरोधातील लोकांचा संताप दिसून आला. उद्या ईव्हीएमच्या मुद्दावरून जनता रस्त्यावर आली आणि अराजक माजले तर त्याला हे सरकार जबाबदार असेल असा इशारा राऊत यांनी दिला आहे. जनतेचा तुम्हाला प्रचंड पाठिंबा असेल तर तुम्ही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास का कचरता असा सवाल त्यांनी विचारला आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भाजपला ग्राम पंचायत आणि नगरपालिका निवडणुकाही जिंकता येणार नाही असं वातावरण या देशात असल्याचे ते म्हणाले.

..तर भाजपला प्रभू श्रीरामही वाचवणार नाहीत

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की,” ज्या मतदानप्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशात लादू इच्छिता? जनतेचा तुम्हाला इतका प्रचंड पाठिंबा आहे, भाजपचे प्रमुख लोकं मोदीजींना विष्णूचा 13 वा अवतार मानतात; प्रभू श्री रामांना घर देण्याची ताकद यांच्यात आहे असं ते सांगतात मग तुम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास का घाबरता? बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास 33 कोटी देवही वाचवणार नाही आणि प्रभू श्रीरामही वाचवणार नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर ग्राम पंचायत आणि नगरपालिका निवडणुकाही जिंकता येणार नाही असं वातावरण या देशात आहे. या देशात मोदींचे राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकूमशाहीचे राज्य आहे. “

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील जागावाटप जवळजवळ निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीसोबतची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे. यावेळेला कोणीही मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही. ओठात एक आणि पोटात एक असं कोणीही करणार नाही असे राऊत यांनी म्हटले. 2-4 दिवसांत दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आम्ही अंतिम चर्चा करून अंतिम मसुदा ठरवू अशी माहिती त्यांनी दिली. देशात 300 जागांवर काँग्रेस विरूद्ध भाजप अशी सरळ लढत असून 150 ते 175 जागांवर प्रादेशिक पक्ष विरूद्ध भाजप अशी लढत आहे. 543 जागांचे गणित आमच्यासमोर स्पष्ट असून 2024 ला या देशात आणि राज्यात परिवर्तन होईल असा आम्हाला दृढ विश्वास असल्याचे राऊत यांनी म्हटले.