शिंदेंची शिवसेना हा डुप्लिकेट माल, म्हणूनच भाजपने धूप घातली नाही! संजय राऊत यांचा निशाणा

Lok Sabha Election 2024 – निवडणूक आयोगाने म्हटलं तरी शिंदेंची शिवसेना हा डुप्लिकेट माल आहे. त्यामुळेच भाजपने त्यांना यंदाच्या निवडणुकीत धूप घातली नाही. नाहीतर त्यांना किमान 22 ते 23 जागा मिळाल्या असत्या, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यावर निशाणा साधला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागावाटपातील राऊत यांच्या भूमिकेवरील विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, यात आश्चर्य व्यक्त करावं असं काहीही नाही. शिवसेना हा राज्यातला आणि देशातला प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षाचं राजकारण या देशात राहणार. नरेंद्र मोदींनी या देशातले प्रादेशिक पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला. किंवा प्रादेशिक पक्षांची कितीही अडचण केली. तरी यापुढे कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्षाचं बोट धरूनच दिल्लीत जावं लागेल. एकदा मोदींची लाट आली आणि गेली ते सोडून द्या. मोदींनी त्या निवडणुका स्वतःच्या करिष्म्यावर जिंकल्या की ईव्हीएमवर हे एक रहस्य आहे. शिवसेना महाराष्ट्रात सातत्याने लोकसभा निवडणुका लढवून चांगला आकडा पाठवत आली आहे. 2019साली आमच्या 18 जागा महाराष्ट्रात निवडून आल्या. त्यातले 13 लोक सोडून गेले. आमदार, खासदार पक्ष सोडून गेले तरी पक्ष, केडर, कार्यकर्ते जागेवर आहेत ती आमची ताकद आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास दाखवला. त्यांच्याबाबत जे घडलं त्याबद्दल प्रचंड सहानुभूती जनतेत आहे. अशा वेळेला याचा फायदा आमच्या मित्रपक्षाने घ्यावा ही आमची भूमिका आहे. त्यानुसार आम्ही जागावाटप करण्याचा प्रयत्न केला आहे. आमची पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्या सिटींग जागा आहेत, त्यावर शक्यतो चर्चा करायची नाही. पण काँग्रेसकडे सिटींग जागा नव्हती. जे चंद्रपूरचे होते, त्यांचं निधन झालं. राष्ट्रवादीकडे चार ते पाच जागा होत्या. त्या जागांवर नक्कीच त्यांचा अधिकार आहे. 18 जागांवर आमचा अधिकार आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची भाजपशी जागावाटपाबाबत वाटाघाटी करताना दमछाक होताना दिसत आहे. अजूनही महायुतीच्या 8 ते 9 जागा घोषित करणं बाकी आहे, यावर बोलताना राऊत म्हणाले की, जे सत्य आहे, त्यावरच चर्चा होणार. त्यात कसा बदल करता येईल. निवडणूक आयोग म्हणाला तरी शिंदे हे काही शिवसेना नाहीत. तसं असतं तर त्यांना आम्ही लढवलेल्या 22 ते 23 जागा भाजपकडून मिळाल्या असत्या, त्या मिळाल्या का? आम्ही भाजपसोबत युतीत असताना लोकसभेसाठी 23 जागा लढवल्या होत्या. शिंदेंची भाजपसोबत युती असती तर त्यांना 23 जागा सहज मिळाल्या असत्या. पण तो डुप्लिकेट माल आहे, म्हणून भाजपने त्यांना धूप घातली नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, हे सगळ्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आमची ताकद आहे, त्या जागा आम्ही चर्चेतून घेतल्या आहेत. जोर जबरदस्तीने घेतलेल्या नाहीत, असंही राऊत यावेळी म्हणाले.

सांगली, दक्षिण मध्य मुंबईवरून विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, आम्ही युतीत होतो, तेव्हाही एखाद दुसऱ्या जागेवरून आमचे मतभेद होत होते. हे तर आमचे नवीन भिडू आहेत. दोन पक्ष आहेत. त्यामुळे जागावाटपात एखाददुसऱ्या जागेवरून अडचणी येणार हे गृहित धरलंच होतं. त्यात सांगली आणि भिवंडीचा तिढा निर्माण झाला. बाकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईचा अजिबात वाद नाही. कारण त्या आमच्या विद्यमान जागा आहेत, त्या आमच्याकडेच राहणार होत्या. फक्त सांगली आम्ही नव्याने घेतली. आधी परंपरेने काँग्रेसचे लोक तिथे निवडून आले होते. शिवसेनेची निवडणूक लढवण्याची ताकद तिथे कमी आहे. पण मतदारांच्या संदर्भात म्हणाल तर मतदार मशालीवर मतदान करतील असं आमचं म्हणणं आहे.’

भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या संदर्भातील जागा वाटपात बदल होणार का, या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, आता कोणताही बदल होणार नाही. जागावाटप जाहीर झालं, उमेदवार जाही झाले. आता प्रचारसभा सुरू झाल्या, बैठका होताहेत. अशा प्रकारे नाराजी आमचेही लोक दाखवू शकतात. दाखवलेलीही आहे. पण आपण आघाडीचा धर्म पाळला पाहिजे असं सांगून आम्ही त्यांना थांबवलं आहे. तसं काँग्रेसनेही त्यांच्या लोकांना सांगायला हवं. शिवसेनेचे 18 तर महाविकास आघाडीचे 35हून अधिक खासदार निवडून येतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.