औरंगजेबाचे पोस्टर झळकवणारा सर्फराज नगर जिल्ह्यातून हद्दपार

नगर शहरातील फकीरवाडा परिसरात ४ जूनला दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या संदल उरुस मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा असलेले पोस्टर झळकाविण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपी मोहम्मद सर्फराज इब्राहिम सय्यद ऊर्फ सर्फराज जहागीरदार याला नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. नगरमधील संदल उरुस मिरवणुकीमध्ये चौघांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकाविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे राज्यभर पडसाद उमटले होते. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी मोहम्मद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागीरदार (रा. दर्गादायरा, नगर), अफनान आदिल शेख ऊर्फ खडा (रा. वाबळे कॉलनी, नगर), शेख सरवर (रा. झेंडीगेट, नगर), जावेद शेख ऊर्फ गब्बर (रा. आशा टॉकीज चौक, नगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखत भिंगार पोलिसांनी सर्फराज याचा हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. यावर शिक्कामोर्तब झाले असून, विभागीय दंडाधिकारी यांनी सर्फराजला दोन वर्षांकरिता नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश काढला आहे.