मोदी सरकार निवडणुकीत बिझी; सीमेवर सियाचीन हिमशिखरांजवळ चीनने रस्ता बांधला!

हिंदुस्थानच्या हद्दीतील सियाचीन हिमशिखरांच्या उत्तरेकडील खालच्या भागात चीनव्याप्त कश्मीरमध्ये चीन जियानजिंग प्रांताला जोडणारा एक काँक्रिटचा रस्ता बांधत आहे. त्याचे बरेचसे काम पूर्णही झाले आहे. उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांमुळे चीनचे हे नवे उपद्व्याप उघडकीस आले असून हिंदुस्थानच्या सुरक्षेला यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी असलेल्या सियाचीनच्या उत्तरेकडे पाकव्याप्त कश्मीरचा शक्सगम खोऱ्याचा भाग आहे. 1963 मध्ये हा भाग पाकिस्तानने परस्पर चीनला बहाल केला होता. याच खोऱ्यातून चीन त्यांचा महामार्ग जी 219 पुढे वाढवत आहे. चीन शिनजियांग म्हणत असलेल्या भागाला हा महामार्ग जोडण्यात येणार आहे. सियाचीन हिमशिखरांमधील इंदिरा खिंडीच्या उत्तरेला अवघ्या 50 किमी अंतरावरून हा महामार्ग जाणार आहे.

सरकारकडून अवाक्षरही नाही

चीनच्या उचापती सुरू असताना मोदी सरकार सुशेगाद असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये दोनवेळा सियाचीनला भेट दिली होती. आता चीनची घुसखोरी समोर आल्यानंतर केंद्र सरकारने त्यावर अवाक्षरही काढलेले नाही.

चीनकडे तत्काळ विरोध नोंदवायला हवा

कारगील, सियाचीन आणि पूर्व लडाखच्या संरक्षणासाठी लष्कराची फायर अँड फ्युरी कोअर तैनात आहे. चीनने बांधलेला हा रस्ता पूर्णपणे बेकायदा असल्याचे या सैन्यदलाचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश शर्मा यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानने राजनैतिक स्तरावर हा मुद्दा उपस्थित करून चीनकडे तत्काळ विरोध नोंदवायला हवा, असे त्यांनी सांगितले.

युरेनियमसमृद्ध प्रदेशावर चीनचा डोळा

शक्सगम खोऱ्याच्या जवळ असलेल्या पाकिस्तानी सीमेजवळील गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतात युरेनियमसमृद्ध भाग आहे. हे युरेनियम शक्सगम खोऱ्यातून पुढे शिनजियांगकडे पाठवण्यासाठी चीन हा रस्ता बनवत असल्याचे राकेश शर्मा यांचे म्हणणे आहे. चीन आणि पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींसाठीही हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.

काराकोरम त्रिबिंदू माऱ्याच्या टप्प्यात

हिंदुस्थान-तिबेट सीमेवरील घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या नेचर देसई या एक्सवरील अकाऊंटद्वारे सर्वप्रथम असा रस्ता बांधला जात असल्याचे उघडकीस आणले गेले होते. हिंदुस्थान, चीन आणि पाकिस्तानच्या सीमा एकत्र येणाऱ्या काराकोरम त्रिबिंदूच्या जवळच हा नवा महामार्ग आहे. हिंदुस्थानने अलीकडच्या नकाशात हा भाग आपल्या हद्दीत दाखवला आहे. 1947 च्या युद्धात पाकिस्तानने जवळपास 5300 चौरस किलो मीटरच्या या भागावर कब्जा केला होता. त्यातलाच काही भाग पाकिस्तानने नंतर चीनला देऊन टाकला. मात्र, हिंदुस्थानने त्याला मान्यता दिली नसून, पाकव्याप्त कश्मीरच्या या भागाच्या हद्दीत असा काही बदल केला गेला तर त्याला हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि सीमेवरील हल्ला मानला जाईल, असे हिंदुस्थानातील संरक्षण तज्ञांनी नेहमीच म्हटले आहे.

चीनचा हा नवा रस्ता कश्मीर आणि तिबेटला जोडणाऱ्या अघिल खिंडीतून जातो. याच मार्गावरून चिनी प्रवासी पूर्वी प्रवास करायचे. अघिल खिंड आणि शक्सगाम खोऱ्यावर हिंदुस्थानने नेहमीच आपला हक्क सांगितला आहे. चीनने 1917, 1919 आणि 1923 मध्ये जारी केलेल्या नकाशांमध्येही हा भाग हिंदुस्थानच्याच हद्दीत दाखवला होता. शक्सगम खोरे पाकव्याप्त कश्मीरचा भाग आहे. हा सर्व प्रदेश परत मिळवण्याचे दावे सरकारने अनेकवेळा संसदेतही केले आहेत.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या उपग्रहाने ही छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांची तपासणी केली असता, गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत चीनने हा रस्ता जवळपास पूर्ण बांधून काढला आहे.