सौदीची हसिना मिस युनिव्हर्स स्पर्धेत

या वर्षाच्या अखेरीस मेक्सिकोमध्ये होणाऱया ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सौदी अरेबिया पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. 27 वर्षीय मॉडेल रुमी अलखतानी ही सौदी अरेबियाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

रुमी ही सौदी अरेबियाची राजधानी रियाधची रहिवासी आहे. मॉडेल असण्यासोबतच ती सोशल मीडिया इन्फ्ल्यूयंसरही आहे.   इन्स्टाग्रामवर तिचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकतेच तिने मिस एशियन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा मलेशियामध्ये झाली होती.

रुमीने यापूर्वी मिस सौदी अरेबिया, मिस मिडल इस्ट, मिस अरब वर्ल्ड पीस आणि मिस वुमन (सौदी अरेबिया) या सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. रुमीने स्वतः मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होत असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी महिला असल्याचा आनंद आहे, असे तिने म्हटले. रुमीने स्वतः सौदीच्या ध्वजासह हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.  मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा 1952 मध्ये पहिल्यांदा झाली.  लेबनॉन आणि बहरीनसारख्या अरब देशांतील मुली सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत.