मुख्य सचिव पदावर सुजाता सौनिक की इकबालसिंह चहल

राज्याचे विद्यमान सचिव नितीन करीर यांचा मुदतवाढ मिळण्याची शक्यता मावळली असून तीन ज्येष्ठ सनदी अधिकाऱयांच्या नावांचे पॅनेल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. त्यात सर्वात ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक, राजेश कुमार व इक्बालसिंह चहल यांच्या नावांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर हे 31 मार्च रोजी  निवृत्त होत आहेत. निवडणुकीच्या काळात सर्वसाधारणपणे मुख्य सचिव पदावरील अधिकाऱयाला मुदतवाढ दिली जाते. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाने नितीन करीर यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेला नाही. निवडणूक आयोगाने मुख्य सचिव पदासाठी तीन अधिकाऱयांच्या नावाचे पॅनेल पाठवण्याची सूचना केली आहे. त्यात 1987च्या बॅचच्या सुजाता सौनिक, 1989 बॅचचे इक्बालसिंह चहल व राजेश कुमार यांची नावे आहेत.

इक्बालसिंह चहल यांचे  दिल्लीत लॉबिंग

मुख्य सचिव पदावर वर्णी लावण्यासाठी इक्लाबसिंह चहल यांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे समजते. मुख्यमंत्री व नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन झालेल्या मित्र संस्थेवरील मुख्यमंत्र्यांच्या ‘मित्रा’मार्फत दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

महिलेची संधी पुन्हा डावलणार?

आतापर्यंत राज्याच्या मुख्य सचिव पदावर एकदाही महिला सनदी अधिकाऱयाची नियुक्ती झालेली नाही. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ सनदी अधिकारी मेधा गाडगीळ यांना डावलून सेवाज्येष्ठतेत तिसऱया क्रमांकावरील डी.के. जैन यांची नियुक्ती झाली होती. नीला सत्यनारायण, चंद्रा अय्यंगार या महिला अधिकाऱयांनाही मुख्य सचिव पदाची संधी दिली नाही. त्यामुळे दिल्लीश्वर आता तरी सेवा ज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांना संधी देणार का याकडे सनदी अधिकाऱयांचे लक्ष लागले आहे.

पालिका आयुक्त पदासाठीही पॅनेल

पालिका आयुक्त पदासाठीही तीन अधिकाऱयांच्या नावांचे पॅनेल पाठवण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. त्यात ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर व संजय मुखर्जी यांचा समावेश होता. नंतर भूषण गगराणी यांची पालिका आयुक्त पदावर नियुक्ती झाली तर इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे.