बांगलादेशच्या सीमेवर बसून सेक्स्टॉर्शनचा कारभार, लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी तिथे जाऊन आरोपीला उचलून आणले 

बांगलादेशच्या बॉर्डरवर मनी ट्रान्सफरचे काम करण्याबरोबरच महिलांचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करून खंडणी मागणाऱया भामटय़ाला मुंबई पोलिसांनी दणका दिला आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सेक्स्टॉर्शनच्या गुन्ह्यात त्याला तेथे जाऊन बेडय़ा ठोकल्या आहेत.

अब्दुल रहमान मंडल (31) असे त्या आरोपीचे नाव आहे. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका व्यावसायिकाला त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरून अश्लील  फोटो आले होते. ते फोटो त्या व्यावसायिकाच्या पत्नीचे मॉर्फ केलेले होते. पह्टो पाठवणाऱया व्यक्तीने सदर पह्टो व्हायरल व्हायचे नसतील तर 14 हजार दे अशी मागणी केली होती. या प्रकारामुळे व्यावसायिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सेक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ, निरीक्षक शीतल मुंढे यांच्या मार्गदशर्नाखाली सपोनि प्रकाश पाटील, संतोष पवार, आबासाहेब देसाई, झगडे या पथकाने तपास सुरू केला. व्यावसायिकाला त्याच्या पत्नीचे मॉर्फ केलेले अश्लील पह्टो पाठवून पैसे मागणाऱ्या भामटय़ाने यूपीआय आयडी दिला होता. त्या आयडीचा तांत्रिक तपास केला असता सेक्स्टॉर्शन करण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती बंगालच्या परगाना परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तो बांगलादेश सीमेवरील चेकपोस्टवर मनी ट्रान्सफरचे काम करत असल्याचे कळताच पाटील व त्यांच्या पथकाने बंगालला जाऊन अब्दुल मंडल याला पकडून आणले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

लोन अॅपवरून पह्टो आणि संपर्क क्रमांक मिळवले

तक्रारदार व्यावसायिकाच्या पत्नीने एकदा लोन अॅपवरून कर्ज घेतले होते. त्या अॅपवरून आरोपी अब्दुलने व्यावसायिकाच्या पत्नीचे फोटो आणि त्यांच्याकडील संपर्क क्रमांक व समाजमाध्यमावरील माहिती मिळवली. त्यानंतर त्याने त्यांचे मॉर्फिंगद्वारे अश्लील पह्टो बनवून ते व्यावसायिकाच्या पत्नीला पाठवले व पैशांची मागणी करत होता. पण लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बांगलादेश सीमेवर जाऊन अब्दुलच्या मुसक्या आवळल्या.