घरातली लेक वंशाचा नव्हे विचारांचा दिवाही तेवत ठेवू शकते, शरद पवार यांची भावुक पोस्ट

पवार आडनाव दिसेल तिथे मतदान करा असे बारामतीकरांना आवाहन करणाऱया अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करतानाच, ‘घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते…’ अशी भावुक पोस्ट राष्ट्रवादीने सोशल मीडियावर केली आहे.

अजित पवार यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी बारामतीतील सभेत भाषण केले होते. आतापर्यंत तुम्ही शरद पवारांना निवडून दिलात, त्यानंतर मुलाला म्हणजे मला मतदान केलेत, नंतर मुलगी सुप्रिया सुळेंना मतदान केलेत, आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचे समाधान लाभेल, असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांकडे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी केले होते. भावनिक न होता, पवार आडनाव दिसेल तिथे मतदान करा, असे ते म्हणाले होते.

अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते… असा पुढारलेला विचार शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो. म्हणून महाराष्ट्र देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळा ठरतो. बाकी बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास यात रमू दे, त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही!’ असे या पोस्टमध्ये नमूद आहे.

या पोस्टबरोबर शरद पवार यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. एकच मुलगी असल्याबद्दल त्यांना त्यात प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी सांगितले की, ‘एकच मुलगी का? असे अनेकजण विचारतात. मुलगा असता तर बरे झाले असते. नाव चालवायला कुणीतरी हवे. बरेवाईट झाल्यावर मुलाने अग्नी दिल्यावरच स्वर्गाचा रस्ता खुला होतो असे लोक म्हणतात. त्याबाबत मला वाटते की, जिवंत नसताना अग्नी कोण देणार? याची चिंता करायची की आपण जिवंत असताना नीटनेटके वागण्याची चिंता करायची? मुलगा आणि मुलगी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्याज्य आहे. तो टाकून दिला पाहिजे. आपण मुलीलासुद्धा मुलासारखे वाढवून, समान संधी देऊन, तिचा आत्मविश्वास वाढवून तिचे व्यक्तिमत्त्व फुलवू शकतो याची खात्री मला आहे.’

मुलगा आणि मुलगी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्याज्य आहे. तो टाकून दिला पाहिजे. आपण मुलीलासुद्धा मुलासारखे वाढवून, समान संधी देऊन, आत्मविश्वास वाढवून तिचे व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला आहे.