‘नमो नमो’ चालते, ‘जय भवानी’ला आक्षेप, हेच हिंदुत्ववादी सरकार आहे काय? संजय राऊत कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला परखड सवाल केला. नमो नमो चालते मग जय भवानी ला आक्षेप का, असा सवाल त्यांनी केला. तसेच सध्याचा निवडणूक आयोग भाजपची शाखा असून त्याचे नाव भाजप निर्वाचन आयोग असे करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात औषधे देण्यात नसल्याबाबत त्यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काळजीवाहून पंतप्रधान आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर ते आता भाजपचे नेते नरेंद्र मोदी आहेत. ते आता पंतप्रधान पदावर नाहीत. ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत. त्यांच्या प्रचारातील मुद्दे हे चिंतेचा विषय आहे. आता ते प्रचारात मंगळसूत्रापर्यंत पोहचले आहेत. एखाद्याला जास्त मुले असणे, कमी मुले असणे हा प्रचाराचा मुद्दा कसा होऊ शकतो. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. ते विकासावर का बोलत नाही, ते देशाच्या सुरक्षेबाबत का बोलत नाही, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

10 वर्षांच्या सत्ताकाळात काय केले आणि पुढच्या योजना काय, राष्ट्रीय मुद्द्यांबाबतही ते बोलत नाहीत. आता प्रचारात ते मंगळसूत्राचा विषय काढत आहेत, यातून त्यांचे विचार दिसत आहे. त्यांचे मानसीक स्थिती बिघडली असून आता पराभवाची भीती त्यांना वाटत आहे. पराभवाच्या भीतीतूनच त्यांच्या तोंडी अशी भाषा येत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करत असेल, तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेण्याची गरज आहे. आमच्या मशाल गीतामध्ये जय भवानी आले तर त्यांना खुपते, हिंदू धर्म, संस्कृतीचा उल्लेख आला तर त्यांना खुपतो. ते शब्द आम्हाला गीतातून हटवण्याचे निर्देश देण्यात येतात. भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे. या राज्याच्या कुलदेवतेचे नाव त्यांना गीतात नको, जय भवानी शब्दाला ते आक्षेप घेतात. मात्र, नरेंद्र मोदी भाषणात माता-भगिनींच्या मंगळसूत्राचा उल्लेख करतात, त्याला आक्षेप का घेण्यात येत नाही, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

सध्याचा निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे. त्याचे नाव आता भाजप निर्वाचन आयोग असे करण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव हा जयघोष राज्यात अनेक वर्षे सुरू आहे. त्यावर कोणी बंदी आणली नव्हती. काँग्रेसच्या राज्यातही अशी बंदी नव्हती. त्यांचे हर घर मोदी चालते. मात्र, हर हर महादेव, जय भवानी चालत नाही. त्यांचे नमो नमो चालते पण जय भवानी चालत नाही, हेच हिंदुत्ववादी सरकार आहे काय, असा सवालही संजय राऊत यांनी केला. त्यांचे व्यापारी आणि नकली हिंदुत्व आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या आसपासही भाजप फिरकू शकत नाही.

भाजपमध्ये भ्रष्टाचारी आणि खोटारडे लोक आहेत. भाजपमध्ये एखाद्याने प्रवेश केल्यावर त्यांना खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मिंधे अजित पवार आता रेटून खोटे बोलत आहे. आज त्यांची तुरुंगवारी टळली असेल, मात्र, यापुढे त्यांची तुरुंगवारी टळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही देशासाठी काम करत आहोत. इंडिया आघाडी किंवा भारत म्हणजे अदानी, मोदी शहा नाही. इंडिया, भारत हा आमचा देश आहे आणि आम्ही देशासाठी काम करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांना इन्सुलीन आणि औषधे मिळत नाही. आपल्यालाही तुरुंगात असताना औषधे मिळत नव्हती. अरविंद केजरीवाल एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत आहे. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. निदान मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना औषधे मिळायला हवीत, त्यांना औषधे न देता त्यांची हत्या करण्याचा सरकारचा कट आहे का, असा रोखठोक सवालही संजय राऊत यांनी केला.

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्यासारख्यांना तुरुंगात औषधपाणी मिळत नसेल, तर सामान्य कैद्यांची काय अवस्था असेल, याची कल्पना येते. हे सर्व गुन्हेहार नाहीत. मात्र, भाजपने सुडाच्या राजकारणापोटी त्यांना तुरुंगात डांबले आहे. या नेत्यांना तुरुंगात ठेवले असली तरी त्यांच्या औषधांची व्यवस्था सरकारन करण्याची गरज आहे. आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, बाळासाहेब देवरस यांच्यासारख्या नेत्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या औषधांची आणि पथ्यपाण्याची योग्य व्यवस्था केली होती, असेही संजय राऊत यांनी सांगितले. मोदी आणि अमित शहा यांचे सरकार धोकदायक आणि सैतानी मनोवृत्तीचे आहे. मुख्यमंत्र्यांना अटक करून ते त्यांना औषधपाणीही मिळू देत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.