कोकणातील चिपी विमानतळ डबघाईला,विमानांच्या फेऱ्या सतत रद्द होत असल्याने प्रवासी हैराण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ डबघाईला आले आहे. या विमानतळावरून रोज केवळ दोनच फेऱ्या होतात. त्यासुद्धा सातत्याने रद्द होऊ लागल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. विमानतळाचा कारभार पाहणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे धाव घेतली आहे. हा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचा विषय असल्याने राज्य सरकार लवकरच केंद्रीय मंत्र्यांची यासंदर्भात भेट घेणार आहे.

चिपी विमानतळ सुरू झाले तेव्हा मुंबईकर चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वेशिवाय आणखी एक पर्याय उपलब्ध झाला. परंतु मुंबई ते चिपी अशा प्रवासासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागतात. ते सर्वांनाच परवडणारे नाही. मात्र गणेशोत्सवाच्या काळात या विमान प्रवासाला चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु आता विमानेच रद्द होऊ लागल्याने चाकरमानीही चिंतेत पडले आहेत.

चिपी विमानतळावरून विमान उड्डाणांचे कंत्राट केंद्र सरकारने फक्त अलायन्स एअर या एकाच कंपनीला दिले आहे. या कंपनीकडे 20 विमाने असून त्यातील तीन विमाने मुंबई-चिपी प्रवासासाठी वापरली जातात. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून विमानांच्या मोजक्याच फेऱ्या झाल्याने प्रवासी हैराण झाले. प्रवाशांनी बुकिंग केलेले असते, ते विमानतळावर पोहोचतात आणि अचानक सांगितले जाते की, विमान रद्द करण्यात आले आहे. असे वारंवार होऊ लागल्याच्या तक्रारी प्रवासी आणि पर्यटकांकडून सरकारकडे आल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

 सरकारचे फक्त आश्वासन

गणेशोत्सव हा कोकणातील एक महत्त्वाचा उत्सव असून गणेशोत्सवापूर्वी या सर्व अडचणींवर उपाय होणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात आज चिपी विमानतळाचा कारभार पाहणाऱया अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अलायन्स एअरकडून विमानांच्या फेऱया रद्द केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विमान उड्डाणाच्या फेऱयांबाबत असणारी अडचण दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी लवकरच संपर्क साधला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.