वन्य जीवांच्या संरक्षणासाठी पुढाकार

देशभरात वन्य प्राण्यांची दुर्दशा वाढतेय. भटके प्राणी रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांची काळजी घेणारे कोणीही नाही. अशा निष्पाप जीवांच्या बचावासाठी सामाजिक कार्यकर्ते हार्दिक हुंडिया यांनी रामनवमीनिमित्त ‘अवतरण श्रीराम का’ या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये केले होते. आतंरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार मनोज दास यांनी या कार्यक्रमात गंगेचे शुद्ध पाणी आणि नैसर्गिक रंगांच्या मिश्रणातून एका कॅनव्हासवर रवी जैन यांची भक्तिगीते आणि बलविंदर सिंग यांच्या मधुर बासरीच्या सुरात प्रभू श्रीरामाचे अप्रतिम चित्र काढले. साडेपाच लाखांची सर्वाधिक बोली लावून हे चित्र भरत कोठारी यांनी विकत घेतले. बोलीचे पैसे भरत कोठारी वन्य जीवांच्या संवर्धनासाठी खर्च करणार आहेत.

गुजरातमधील चार हजारांहून अधिक कत्तलखाने बंद करण्यासाठी कायदेशीर लढा लढणारे अधिवक्ता धर्मेंद्र फोफानी यांना ‘स्टार जीव सारथी कायदा रत्न’ पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. यासोबतच हिरे व्यापारी महेंद्र गांधी आणि रोहित शहा यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ तर बालकलाकार विवा कोठारी हिचादेखील विशेष सन्मान करण्यात आला. डायमंड किंग भरत शाह, सुनीता हुंडिया, पृथ्वीराज कोठारी, मौलिक शहा, स्मिता साळसकर, डॉ. गौतम भन्साळी, मनीष अजमेरा, अतुल शहा, आकाश पुरोहित, नचिकेता ब्रह्मभट्ट, शंकर सोलंकी, चंद्रप्रकाश जैन, अनिता नागडा या कार्यक्रमात उपस्थित होते.