अंतराळ प्रवासात व्यक्तिचा मृत्यू झाला, तर मृतदेह पृथ्वीवर आणण्याबाबत ‘नासा’चे नियम काय आहेत; जाणून घ्या

अंतराळात प्रवास करत असताना अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नासाच्या नियमानुसार, अंतराळात मृत्यू झालेल्या प्रवाशांबाबत माहिती देण्यात आली आहे.

हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांतील लोक अंतराळात प्रवास करतात. बहुतांश देशातील लोक ‘स्पेस प्रोग्राम’ या विषयावर काम करत आहेत. अंतराळात दडलेली रहस्ये शोधण्यासाठी मागील 6 दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. चंद्रावर मानव पाठवणारा ‘अमेरिका’ हा एकमेव देश आहे. पुढच्या वर्षी हिंदुस्थानात गगनयानाच्या माध्यमातून प्रथमच अंतराळात मानवाला पाठवण्याची तयारी सुरू आहे. अंतराळात प्रवास करण्याची ही मोहिम इतकी धोकादायक असते की, काही वेळा लोकांना अवकाशात अपघाताने आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता असते.

अंतराळ प्रवासात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 1986 ते 2003 नासाच्या स्पेस शटल दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला. 1971 मध्ये सोयुझ 11 मोहिमेदरम्यान तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता आणि 1967 मध्ये अपोलो 1 लाँच पॅडला लागलेल्या आगीत 3 अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. 2025 मध्ये चंद्रावर क्रू आणि पुढच्या दशकात मंगळावर अंतराळवीर पाठवण्याची नासाची योजना आहे. व्यावसायिक अंतराळ उड्डाण आता नित्याचे होत आहे. त्यामुळे या अंतराळ यात्रेदरम्यान एखाद्या व्यक्तिचा मृत्यू होऊ शकतो.

अंतराळात मृत्यू झाला तर …
एखादी व्यक्ती जर अंतराळ मोहिमेवर गेली आणि काही तासांत तिचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तिचे मृत शरीर एका कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर आणले जाते. मृत्यूची ही घटना जर चंद्रावर घडली, तर काही दिवसांनी मृतदेह पृथ्वीवर आणला जातो. अशा वेळी नेमके काय करायला हवे, याविषयी ‘नासा’ने काही नियम ठरवले आहेत. मृतदेह पृथ्वीवर सुरक्षितरित्या आणण्याला नासाकडून प्राधान्य दिले जाते.

मंगळावर अपघात झाला…
मंगळाच्या 3000 दशलक्ष मैलांच्या प्रवासादरम्यान एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला, तर क्रू कदाचित मागे फिरू शकणार नाही; पण अशा वेळी मोहिमेच्या शेवटच्या क्षणी काही वर्षांनी मृतदेह पृथ्वीवर परत आणण्याची शक्यता नासाने दिली आहे. अशावेळी मृत शरीराला वेगळ्या चेंबरमध्ये विशेष बॉडी बॅगमध्ये सुरक्षित ठेवण्यात येते, मात्र एखाद्या व्यक्तिचा अंतरीक्ष यानातील दबावयुक्त वातावरणात मृत्यू झाला, तर हे शक्य होऊ शकते.