षटकारबाजीत हैदराबादने मारली 31 धावांनी बाजी, आयपीएलमध्ये विक्रमी धावसंख्येचा नवा विक्रम

आज हैदराबादमध्ये षटकारांसह धावांचाही वर्षाव झाला. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च 277 धावसंख्येचा नवा विक्रम रचल्यानंतर मुंबई इंडियन्सनेही त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी जंग जंग पछाडले, पण ते 31 धावांनी कमीच पडले. 38 षटकार आणि 523 धावांच्या नव्या विक्रमाने आजचा सामना संस्मरणीय ठरला.

 ट्रव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेन्रीक क्लासनच्या झंझावाती आणि घणाघाती अर्धशतकांमुळे हैदराबादने अक्षरशः 18 षटकार आणि 19 चौकारांची आतषबाजी केली होती तर प्रत्युत्तरादाखल मुंबईने 3 षटकांतच अर्धशतकी भागी रचत सुस्साट सुरुवात केली. रोहित शर्मा आणि इशान किशनच्या फटकेबाजीमुळे सामन्यात रंगत वाढली होती. मग नमन धीर आणि तिलक वर्माने षटकारबाजी करत मुंबईचे आव्हान कायम राखले. तिलकने  6 उत्तुंग षटकार खेचत हैदराबादलाही अक्षरशः घाम फोडला. पण 34 चेंडूंत 64 धावा ठोकून वर्मा बाद झाल्यावर मुंबईच्या हातून लक्ष्य निसटले आणि हैदराबादने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. हार्दिक पंडय़ा (24) आणि टीम डेव्हिड (42) यांनी आक्रमक फलंदाजी केली असली तरी ते संघाला विजयासमीपही घेऊन जाऊ शकले नाही. ते असूनही मुंबईचा पराभव दोन षटके आधीच निश्चित झाला. त्यावर सामन्यातील शेवटच्या चेंडूवर 31 धावांनी शिक्कामोर्तब करण्यात आले.

आज आयपीएलच्या अनेक विक्रमांनी हैदराबादचे आभार मानले. ट्रव्हिस हेडच्या षटकारांपासून सुरू झालेला झंझावात क्लासनच्या घणाघातानंतर थांबला. हेडने 18 चेंडूंत आपल्या धावांची पन्नाशी साजरी केली तर त्यानंतर अभिषेक शर्मानेही मुंबईच्या गोलंदाजीला फोडून काढताना आपले अर्धशतक 16 व्या चेंडूवर साजरे केले. त्यानंतर क्लासननेही आक्रमक खेळ करताना 23 व्या चेंडूंवर 50 धावा पूर्ण केल्या. तसेच एडन मार्करमलाही अर्धशतकाची संधी होती, पण तो 42 धावांवर नाबाद राहिला. अन्यथा एका टी-20 सामन्यात चार अर्धशतकांचा नवा विक्रमही प्रस्थापित झाला असता.

आजच्या सामन्यात हैदराबादचे स्टेडियम चौकार-षटकारांच्या आतषबाजीने उजळून निघाले होते. हैदराबादच्या डावाची सुरुवात करणाऱया हेडचा झंझावात अद्भुत होता आणि अभिषेक शर्माने त्याला चारचांद लावले. दोघांनीही मुंबईच्या गोलंदाजीचा चेंदामेंदा करत 47 चेंडूंत 125 धावा ठोकल्या. यात 12 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. हेडचा झंझावात 24 चेंडूंनंतर 62 धावांवर थांबला तर अभिषेकने 23 चेंडूंत 63 धावा फटकावताना चक्क 7 षटकार खेचले. दोघेही 11 व्या षटकापर्यंत माघारी परतले होते. त्यानंतर उर्वरित 9 षटकांत क्लासन आणि मार्करम या आफ्रिकन फलंदाजांचे वादळ घोंघावले.

दोघांनी 116 धावांची भागी रचताना हैदराबादला आयपीएलमधील सर्वोच्च 277 धावसंख्या गाठून दिली. 11 वर्षांपूर्वी बंगळुरूने ख्रिस गेलच्या 175 धावांच्या अभेद्य आणि विक्रमी खेळीच्या जोरावर पुणे वॉरिअर्सविरुद्ध 5 बाद 263 धावांचा विक्रम रचला होता, जो आज क्लासन-मार्करम जोडीने मोडीत काढला. क्लासनने 34 चेंडूंत नाबाद 80 धावा काढताना 7 षटकारांची बरसात केली. आज हैदराबादच्या 3 फलंदाजांनी अर्धशतके झळकावताना मुंबईच्या पदार्पणवीर क्वेना मफाका आणि जिराल्ड कोत्झी या आफ्रिकन गोलंदाजांच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 66 आणि 57 अशा धावा चोपून काढल्या. एकाच सामन्यात दोन गोलंदाजांच्या स्पेलमध्ये 50 धावा काढण्याचीही पहिलीच वेळ आहे. तसेच पदार्पणातच सर्वाधिक धावा देण्याचा दुर्दैवी विक्रम मफाकाच्या नावावर चढला.

प्रथमच एकाच सामन्यात 500 धावा

आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका सामन्यात 500 पेक्षा अधिक धावा झाल्या. सनरायझर्स हैदराबादने 277 धावांचा विक्रम केल्यानंतर मुंबई इंडियन्सने 5 बाद 246 अशी मजल मारली आणि एका सामन्यात 523 धावांचा नवा विक्रम रचला गेला. याआधी 2010 साली चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात 469 धावा काढल्या गेल्या होत्या. तो विक्रम आज मोडला गेला. मात्र आज दोन्ही डावांत 250 धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम अवघ्या 4 धावांनी हुकला. तसेच हैदराबादचे 18 आणि मुंबईचे 20 असे एकंदर 38 षटकार सामन्यात ठोकले गेले आणि आयपीएलमधील एका सामन्यातील सर्वाधिक षटकारांचा नवा विक्रम रचला गेला.