छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाची तातडीने प्रतिष्ठापना करा! स्थानीय लोकाधिकार समितीचा विमानतळ प्रशासनाला 25 मार्चचा अल्टिमेटम

एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने 1987मध्ये परिवहन विभाग, डोमेस्टिक एअरपोर्ट येथे बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड व्यवस्थापनाने जागा ताब्यात घेतल्यानंतर अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले. स्थानीय लोकाधिकार समितीच्या पाठपुराव्यानंतर हा पुतळा सापडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिष्ठापना 25 मार्चपर्यंत करा, असा इशारा स्थानीय लोकाधिकार समितीने विमानतळ प्रशासनाला दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही अज्ञातांनी हटवल्याचे निदर्शनास येताच समितीच्या पदाधिकाऱयांनी 3 फेब्रुवारी रोजी विमानतळ पोलीस व एअरपोर्ट व्यवस्थापनकडे तक्रार केली. 4 फेब्रुवारी रोजी हा पुतळा सुरक्षा रक्षकांना सापडल्याचे समोर आले. त्यामुळे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड व्यवस्थापनाने पुतळय़ाची प्रतिष्ठापना एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जी.एस.डी. कॉम्प्लेक्स, एअरपोर्ट गेट नंबर-5, सहार येथे करून देतो असे आश्वासन समितीला दिले होते. याची गंभीर दखल घेत आज शिवसेना नेते, सचिव अनिल देसाई यांच्या आदेशानुसार समितीचे अध्यक्ष आमदार विलास पोतनीस व सरचिटणीस प्रशांत सावंत यांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड व्यवस्थापनाला विमानतळ पोलीस ठाण्यात बोलावून याबाबत जाब विचारला.

तातडीने प्रतिष्ठापना करणार
या विषयाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनानेदेखील मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड व्यवस्थापनाला हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या वेळी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. या वेळी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी बाळा कांबळे, प्रवीण शिंदे, उल्हास बिले, सलील कोटकर, अजित चव्हाण, अमोल कदम, दीपक शिंदे, संजय फडतरे, रामकृष्ण आंबेकर आदी उपस्थित होते.