पालिका उद्यानात पक्ष्यांसाठी मिनी पाणपोई; पालिकेच्या उद्यान विभागाचा स्तुत्य उपक्रम

देशासह मुंबईत उष्णतेचा कडाका वाढला असून घराबाहेर पडलेले मुंबईकर उकाडय़ाने हैराण झाले आहेत. उकाडय़ाच्या झळा पक्ष्यांनाही बसायला लागल्या असून तहानेने व्याकुळ झालेल्या नाजूक जीवांची तहान भागून त्यांना थंडावा मिळावा, यासाठी मुंबई महापालिकेने 300 उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. सर्वसामान्यांसाठी पाणपोई असते तशी पक्ष्यांसाठी पसरट भांडय़ाची ‘मिनी पाणपोई’ची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी पालिकेकडून राबवल्या जाणाऱया या उपक्रमांमुळे पक्ष्यांची तहान तर भागत आहे, पण जीवांचे संरक्षणही होत आहे.

मुंबईसह राज्यात पारा 45 पार गेला आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पारा 45 अंश सेल्सिअस पार गेल्याने पर्यावरणप्रेमी आणि पशुपक्षीप्रेमींनी पक्ष्यांसाठी घराच्या खिडक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. कावळा, पोपट, चिमण्यांची तहान भागवण्यासाठी आपल्या परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आपापल्या परीने धडपडत आहेत. यात मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानेही आपल्या परीने पुढाकार घेतला असून 300 उद्यानांत पाण्याने भरलेली भांडी ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मुंबईतील उद्यानांत सकाळी आणि संध्याकाळी पक्ष्यांचा किलबिलाट पाहायला मिळतो. मात्र, दुपारी हा किलबिलाट पूर्णपणे थांबलेला होता. मात्र, पाण्याची व्यवस्था केल्यामुळे भरदुपारीही पालिका उद्यानांमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. तहान भागल्यामुळे काही क्षण विश्रांती घेऊन पक्षी पुन्हा आपापल्या घरटय़ांकडे भरारी घेत आहेत.

पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण थांबली

मुंबईसारख्या शहरात आजूबाजूला सहजच दिसणारे कावळा, पोपट, चिमण्या, मैना, सूर्यपक्षी, कबुतर या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जिकडेतिकडे वणवण करावी लागत होती. मात्र, उद्यान विभागाने 300 हून अधिक उद्यानांत टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या भांडय़ात पाणी उपलब्ध करून दिले आहे. या भांडय़ांतील पाणी दिवसातून तीन ते चार वेळा बदलले जाते. त्यामुळे पक्ष्यांची वणवण थांबली आहे.