खेळाडूंमध्ये सौहार्दाचा अभाव, हिंदुस्थानचा संघ विखुरलेला; गावसकरांनी टोचले ‘हिटमॅन’चे कान

हिंदुस्थानी क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातील टी20 वर्ल्डकप फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही. हिंदुस्थानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गमावली. आशिया चषक 2022 आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत झालेली खराब कामगिरी, यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने गेल्या फेब्रुवारीत टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा इतर दिग्गज क्रिकेटपटूंसारख्या सुनील गावसकर यांना देखील त्याच्याकडून खूप आशा होत्या.

सुनील गावसकर खेळाडूंमधील सौहार्द आणि सामंजस्य यावर म्हणाले की, “टीम इंडियातील खेळाडूंमध्ये सौहार्दाचा अभाव दिसत असून ही बाब निराशाजनक आहे. संघाची चांगली कामगिरी चांगली न होण्यामागे हेच कारण असू शकते. हिंदुस्थानी संघ विखुरलेला दिसत आहे. आगामी विश्वचषकाचा विचार करता ही खूप गंभीर बाब आहे. खेळ संपल्यानंतर तुम्ही एकत्र यायला हवे आणि विविध विषयांवर गप्पा गोष्टी करायला हव्यात. जर तुम्ही एकत्र येत नसाल तर हिंदुस्थानी संघासाठी ही निराशाजनक आणि विचार करण्याची गोष्ट आहे. हॉटेलमध्ये प्रत्येक खेळाडूला एक स्वतंत्र खोली मिळते. हे देखील यामागचे एक प्रमुख कारण असू शकते.”