राखी सावंतला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूर्वाश्रमीचा पती आदिल दुर्रानी याचे खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकऱणी दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने राखीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. तसेच पुढील चार आठवड़्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश देखील न्यायालयाने राखीला दिले आहेत.

बदनामी करण्याच्या हेतूने राखीने आमचे खासगी व्हिडिओ अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दाखवल्याचा आरोप तिचा विभक्त पती आदिल दुर्राणीने केला. त्यानंतर आदिल दुर्राणीच्या तक्रारीवरून राखीविरोधात उपनगरीय आंबोली पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आपल्याला खोट्या आणि बोगस प्रकरणात नाहक त्रास देण्याच्या, दबाव आणण्याच्या हेतूने एफआयआर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा कायदेशीर प्रक्रियेचा निव्वळ दुरुपयोग असून गुणवत्तेच्या आधारावर तो टिकणार नाही असा दावा राखीने केला होता.