मराठा समाजाचे मंगळवारपासून सर्वेक्षण

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी मंगळवार 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यातील सर्व जिह्यांसह महानगरपालिका, नगरपालिकांतील कर्मचाऱ्यांना या सर्वेक्षणासाठी शनिवारपासून दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर थेट सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. महसूल विभागाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

विविध निकषांच्या आधारे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. ते कसे वापरायचे याचे प्रशिक्षण पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूटकडील तज्ञांकडून 20 जानेवारीपासून जिल्हा आणि महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी देण्यात येणार आहे.  अशी माहिती आयोगाने दिली. नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत विशेष ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कुणबी नोंदी आढळलेल्या कुटुंबांना दाखले मिळणार

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाची डेडलाइन जवळ येताच राज्य सरकारची पळापळ सुरू झाली आहे. कुणबी नोंदी तपासण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला विविध जिह्यांमध्ये 54 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्या सर्व पात्र कुटुंबांना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे दाखले तातडीने द्यावेत असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.