लक्ष्य, श्रीकांत, सिंधूवर हिंदुस्थानची मदार! स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून (दि. 19) सुरू होत आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानची मदार ही झुंजार वृत्तीचा लक्ष्य सेन, माजी अव्वल मानांकित किदाम्बी श्रीकांत व अनुभवी पी. व्ही. सिंधू यांच्यावर असेल.

22 वर्षीय लक्ष्य सेनने फेंच ओपन व नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. सातव्या मानांकित या हिंदुस्थानी खेळाडूची सलामी मलेशियाच्या लियोंग जून हाओ यांच्याशी झडणार आहे. किदाम्बी श्रीकांतपुढे पहिल्या फेरीत आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या चिनी तैपेईच्या वांग त्जु-वेई याचे आव्हान असेल. हिंदुस्थानचा युवा खेळाडू प्रियांशू राजावत हा हाँगकाँगच्या चतुर्थ मानांकित ली चेऊक यियू याच्याविरुद्ध आपल्या अभियानास प्रारंभ करेल.

पी. व्ही. सिंधूने गुडघ्याच्या दुखापतीनंतर याच महिन्यात फ्रेंच ओपन स्पर्धेतून पुनरागमन करताना उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केला होता, मात्र त्यानंतर ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये तिला दुसऱया फेरीत पराभव पत्करावा लागला होता. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती असलेल्या सिंधूची सलामी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपप्रमाणेच जर्मनीच्या वोन्ने लि हिच्याशी होईल. गत आठवडय़ात जर्मनीच्या या खेळाडूने दुखापतीमुळे अर्ध्यावरून लढत सोडली होती. महिला एकेरीत हिंदुस्थानच्या आकर्षी कश्यपला कठीण ड्रॉ मिळाला आहे. तिला सलामीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल ली हिचे आव्हान असेल. याचबरोबर तनीषा क्रास्टो व अश्विनी पोनप्पा ही सहावे मानांकित असलेली जोडी मेइलिसा ट्रायस व राचेल एलेस्या या इंडोनेशियन जोडीविरुद्धच्या लढतीने स्पर्धेचा शुभारंभ करतील. आठवे मानांकित प्राप्त त्रिसा जॉली व गायत्री गोपीचंद ही हिंदुस्थानी जोडी एनी जू व केरी जू या अमेरिकन जोडीविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानास प्रारंभ करतील.