मुख्यमंत्री साहेब, नगर शहरातील राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा; शहर काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नगर शहरात खुनी हल्ले, हत्याकांड यांचे सत्र सुरुच आहे. सावेडीमध्ये जमिनीवर बेकायदेशीर ताबा करणे, अवैध धंदे आणि राजकीय वरदहस्तातून टोळी युद्ध सुरू आहे. यामुळे नगर शहराची बदनामी होत आहे. शहराचा विकास खुंटला आहे. गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आहेत. मुख्यमंत्री साहेब, नगर शहरातील या राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

काळे म्हणाले की, सावेडी उपनगराला लोकांची पसंती असणारी वसाहत म्हणून पाहिले जात होते. मात्र अलीकडच्या काळामध्ये या भागामध्ये विशेषतः प्रभाग 1 व 2 मध्ये नागरिकांच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबे घालत धुडगूस सुरू आहे. अवैद्य धंद्यांवरून टोळी युद्ध सुरू आहेत. राजकीय पाठबळाच्या माध्यमातून शहराला वेठीस धरले जात आहे. पोलीस ठाण्यात गुन्हेगारांना रेड कार्पेट वागणूक दिली जात आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची पोलीस केवळ कागदोपत्री पूर्तता करत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. तडीपार, एमपीडीए, मोक्काची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे जरी पोलीस प्रशासन म्हणत असले, तरी प्रत्यक्षात गुन्हेगार शहरामध्ये राजरोसपणे उजळ माथ्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून फिरत आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून खून आणि मारामारीचे प्रकार वाढले आहेत. त्याचप्रमाणे मंगळसूत्र चोरी आणि दिवसाढवळ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकारही वाढले आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. आपण गृहमंत्री यांना भेटून या संदर्भामध्ये निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले

काँग्रेसचे संतप्त सवाल
सर्वसामान्य नगरकरांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. यामुळे शहराची सातत्याने बदनामी होत असून शहराच्या विकासावर मात्र कोणी ही बोलायला तयार नाही. अशा घटनांमुळे शहरामध्ये मोठ्या कंपन्या कशा येतील ? तरुणांच्या हातात लाठ्या, काठ्या, तलवारी दिल्या जात असतील तर तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल ? व्यापारी व्यापार कसा करतील ? शहरातल्या युवक, नागरिकांनी यातून नेमका काय आदर्श घ्यायचा ? असे अनेक संतप्त सवाल किरण काळे यांनी निवेदनात केले आहेत.

गृहमंत्र्यांनी मैदानात उतरावे
भाजप नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्याच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकतेच शहरातील गुंडगिरी बाबत निवेदन दिले होते. सावेडी खूनी हल्ल्यातील आरोपी हा भाजपचाच विद्यमान नगरसेवक आहे. ज्याच्यावर हल्ला झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस गद्दार गटाच्या आमदारांचा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन गॅंगमध्ये टोळी युद्ध सुरू आहे. राज्यातल्या सत्तेचा उपयोग शहराच्या विकासासाठी नव्हे तर आपल्या राजकीय गुंड कार्यकर्त्यांना वाचण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकार करत असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः नगरच्या मैदानात उतरत गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे जाहीर आव्हान काँग्रेसने केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाची प्रत गृहमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे.

नांगरे पाटील, कृष्णप्रकाशांसारख्या दबंग अधिकाऱ्याची गरज
यापूर्वी देखील नगर शहरात राजकीय गुन्हेगारी बोकाळली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वासराव नांगरे पाटील, कृष्णा प्रकाश यांच्यासारख्या दबंग अधिकाऱ्यांनी घाण साफ करण्याचे काम केले होते. सध्याची भयावह परिस्थिती पाहता याचा शहर विकासावर नकारात्मक परिणाम होत असल्यामुळे पुन्हा एकदा अशा दबंग एसपींची शहराला गरज असल्यासची भावना किरण काळेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.