जो खेळणार तोच अमेरिका गाठणार; आयपीएल ठरणार टी-20 वर्ल्ड कपची निवड चाचणी

आयपीएल म्हणजे आगामी टी-20 वर्ल्ड कपची पूर्वतयारी. आयपीएल म्हणजे टी-20 वर्ल्ड कपची निवड चाचणी. कुणी मानो अगर न मानो हिंदुस्थानचा संघ आयपीएलमध्ये जो खेळणार, त्यालाच अमेरिकेची तिकीट मिळणार, हे निश्चित आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या 15 सदस्यीय संघात स्थान मिळविण्यासाठी कधी नव्हे इतका संघर्ष प्रथमच पाहायला मिळणार आहे.

गेल्या आठवडय़ापासून सुरू झालेल्या आयपीएलचा धमाका निवडणुकीच्या धामधुमीतच होणार आहे. या धामधुमीत आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात ज्या फलंदाजाची बॅट तळपेल तो आपले स्थान आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात निश्चित करू शकतो. येत्या जून महिन्यात अमेरिका आणि पॅरेबियन बेटांवर टी-20 वर्ल्ड कप खेळविला जाणार आहे. यासाठी आयसीसीने 1 मेपर्यंत सहभागी सर्व संघांना आपापले संघ जाहीर करण्याची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात हिंदुस्थानच्या संभाव्य संघात असलेल्या खेळाडूंमध्ये अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष रंगलेला पाहायला मिळेल.

रोहित कर्णधार तर पंड्या कोण?
हिंदुस्थानच्या टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंडय़ाकडे सोपवले होते, मात्र दुखापतीमुळे संघाबाहेर फेकला गेल्यानंतर ते पुन्हा रोहित शर्माकडे आले. आगामी वर्ल्ड कपसाठी रोहितचे कर्णधारपद आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धेतील कोणत्याही कामगिरीचा त्याच्यावर फरक पडणार नाही. असेच हार्दिक पंडय़ाबाबतही बोलले जात आहे. मात्र आयपीएलमधील यश-अपयशाचा संघ निवडीवर नक्कीच फरक पडेल. एखादा स्थान पक्के असलेला खेळाडूही आयपीएलच्या अपयशामुळे संघातून आऊट होऊ शकतो याचे संकेतही निवड समितीने दिले आहेत.

विराटसाठी खुले संघाचे द्वार
विराट कोहली हा हिंदुस्थानी संघाचा अविभाज्य भाग आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज. मात्र गेली दोन वर्षे तो आंतरराष्ट्रीय टी-20 सामने फार कमी खेळला आहे. त्यामुळे काही त्याला निवृत्त समजू लागले आहेत. तसेच त्यानेही आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे तो खेळणार की नाही हे अद्याप अस्पष्टच आहे. तसे तो संघात खेळला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही, मात्र त्याची निवड झाली नाही तर तो नक्कीच धक्का असू शकतो. त्यामुळे तो आयपीएलमध्ये जोरदार खेळ करून आपले स्थान निश्चित करेल, असा चाहत्यांना विश्वास आहे. खरं सांगायचं तर त्याची बॅटच त्याचे संघातील स्थान निश्चित करील.

टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचे पक्के 10 खेळाडू
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैसवाल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, के. एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

उर्वरित 5 जागांसाठी यांच्यात संघर्ष
यष्टिरक्षक- संजू सॅमसन, जितेश वर्मा, ऋषभ पंत
विराट कोहली, शिवम दुबे, रिंकू शर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार.

पंतच्या आगमनाने यष्टिरक्षकांमध्ये युद्ध
14 महिन्यांनंतर ऋषभ पंत पुन्हा एकदा मैदानात परतला आहे. त्याचेही संघातील स्थान पक्के मानले असले तरी त्याची कामगिरीच हे निश्चित करेल की तो खेळणार की नाही. त्यातच के. एल. राहुलला फक्त फलंदाजी करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्याच्या हातात ग्लोव्हज नसणार. मात्र तो एक फलंदाज म्हणून संघात असेल. अशा स्थितीत यष्टिरक्षक म्हणून पंत, इशान किशन, संजू सॅमसन की जितेश वर्मापैकी कुणाची लॉटरी लागते, हे फक्त आयपीएलमधील कामगिरीच्याच आधारे ठरू शकते.

अय्यर-इशान किशनलाही संधी
श्रेयस अय्यर आणि इशान किशन सध्या हिंदुस्थानच्या करारबद्ध यादीत नाहीत. मात्र आयपीएलमधील त्यांची धमाकेदार कामगिरी त्यांचे कमबॅक करू शकते. इशानचा झंझावात टी-20 साठी खूप फायद्याचा आहे. अय्यरसाठीही टी-20 संघाचे द्वार फार लांब नाही. फक्त आयपीएलमध्ये त्यांना आपला खेळ दाखवावाच लागणार.

फक्त 5 खेळाडूंचाच प्रश्न
हिंदुस्थानी संघातील अंदाजे 10 खेळाडूंचे स्थान निश्चित मानले जात आहे. त्यामुळे उरला प्रश्न केवळ 5 खेळाडूंच्या निवडीचा. या 5 खेळाडूंचे भवितव्य आयपीएलची कामगिरी ठरवेल. या 5 खेळाडूंमध्ये विराट कोहली, रिंकू सिंग, इशान किशन, ऋषभ पंत, शिवम दुबे, अक्षर पटेल, ऋतुराज गायकवाडपैकी कुणाचेही नाव असू शकते. तसेच एखादा स्टार आयपीएलमध्ये अफलातून कामगिरी करूनही संघात स्थान मिळवू शकतो. तसेच एकादा खेळाडू आपल्या फिटनेसमुळेही संघाबाहेर गेल्यास त्याच्याजागी कुणाचेही नशीब फळफळू शकते. असेही अनेक खेळाडू सध्या रांगेत आहेत. फक्त बीसीसीआय आणि निवड समिती अशा खेळाडूंना संधी देईल की नाही, हे सांगता येत नाही. मात्र अंतिम 15 खेळाडू निवडताना निवड समितीलाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.