जम्मू-कश्मीरमध्ये लष्करावर हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे चिनी बनावटीची; सूत्रांची माहिती

जम्मू-कश्मीरमध्ये लष्करावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दहशतवादी चीन निर्मित शस्त्रे आणि दळणवळणाची साधने वापरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहमद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटना लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रे, बॉडीसूट कॅमेरे आणि वाहने वापरत आहेत.

याव्यतिरिक्त, चीन पाकिस्तानी सैन्याला ड्रोन, हँडग्रेनेड आणि इतर शस्त्रे देखील पाठवत आहे, ज्याचा वापर दहशतवादी संघटनांनी अलीकडील हल्ल्यांमध्ये केला आहे आणि त्याचे पुरावे सुरक्षा दलांना सापडले आहेत.

या वर्षी झालेल्या तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमधून यातील संबंध उघड झाला आहे.

जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने पाच जवान शहीद झाले आणि दोन जखमी झाले.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर जम्मू-कश्मीरच्या पूंछ-राजौरी सेक्टरमध्ये आणखी सैन्य आणणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. या भागात सैन्याची संख्या वाढवून दहशतवादविरोधी आघाडी मजबूत करण्याची योजना आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

घुसखोरीच्या प्रयत्नात पाकिस्तान हिंदुस्थानच्या सैनिकांवर चिनी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या स्नायपर गन वापरतो. असाच एक हल्ला नोव्हेंबरमध्ये करण्यात आला होता ज्यामध्ये जम्मू सीमेवर लष्कराच्या जवानावर स्नायपर गनचा वापर करण्यात आला होता. या वर्षी तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवादी संघटनेने जारी केलेल्या प्रतिमा चिनी बनावटीच्या बॉडी कॅमेऱ्यांमधून घेतल्या होत्या आणि त्या एडिट आणि मॉर्फ केल्या गेल्या होत्या, असा दावा सूत्रांनी केला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी उघड केल्याप्रमाणे दळणवळणासाठी दहशतवाद्यांनी वापरलेली एन्क्रिप्टेड मेसेजिंग उपकरणे देखील चिनी बनावटीची आहेत.

पाकिस्तानी लष्कराला चीनकडून शस्त्रे, कॅमेरे आणि दळणवळणाची साधने नियमितपणे मिळतात, परंतु ती स्वसंरणक्षासाठी वापरण्याऐवजी ते पाकिस्तान व्याप्त कश्मीरमधील दहशतवादी संघटनांना हिंदुस्थानात घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी उपलब्ध करून देतात.

दरम्यान, गलवानमधील 2020 च्या सीमेवरील तणावानंतर लडाखमध्ये हिंदुस्थानच्या वाढत्या सैन्याच्या उपस्थितीमुळे निराश झालेल्या चीनला जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणायच्या आहेत आणि लडाख सीमेवरून पुन्हा कश्मीरमध्ये सैन्य तैनात करण्यासाठी हिंदुस्थानी सैन्यावर दबाव आणायचा असल्याची सूत्रांची माहिती असल्याचे इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबपोर्टलवरून प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हंटले आहे.

चीनच्या मदतीने पाकिस्तान आपली सायबर शाखा मजबूत करत आहे आणि व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलद्वारे गुप्तपणे नजर ठेवू इच्छित असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. सायबर युद्धासाठी पाकिस्तानसाठी स्वतंत्र माहिती सुरक्षा प्रयोगशाळा उभारण्यासाठी चीन आर्थिक मदत करत आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत, चीन सतत पाकिस्तानला आधुनिक आणि उच्च-तंत्रज्ञान शस्त्रे पुरवत आहे, ज्याचा वापर जैश आणि लष्कर दहशतवादी पाकिस्तानी सैन्याद्वारे काश्मीरमधील सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी करतात.

मात्र, जम्मू आणि लडाख या दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तान आणि चीनला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सुरक्षा यंत्रणेने गेल्या दोन वर्षांत सातत्याने चीनचे प्रयत्न हाणून पाडले आहेत.