भोपाळ विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी, ईमेलमध्ये अन्य विमानतळांचीही नावे

मध्यप्रदेशातील भोपाळचे राजा भोज विमानतळ बॉम्बने उडविण्याची सोमवारी धमकी मिळाली आहे. विमानतळ प्रशासनाला धमकीचा ईमेल आल्याने एकच गोंधळ उडाला. संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे भोपाळ विमानतळासह देशातील इतर अनेक विमानतळांची नावेही ईमेलमध्ये नमूद करण्यात आली आहेत ईमेल मिळाल्यानंतर विमानतळ प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर तपास सुरू झाला.

गांधी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ प्राधिकरणाच्या तक्रारीवरून रिपोर्ट लिहिला आहे. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध कलम 507 आणि विमान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. राजा भोज विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी विशाल कुमार शर्मा यांनी गांधी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, 29 एप्रिल रोजी सकाळी 9.37 वाजता विमानतळ संचालकांच्या अधिकृत ईमेलवर एक ईमेल आला, ज्यामध्ये भोपाळ आणि देशातील अन्य विमानतळांवर आणि विमानात बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती.

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यासोबतच तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचीही तपासणी करण्यात आली. सुमारे 2 तास चाललेल्या या तपासणीत कोणतीही बाब समोर आलेले नाही. मात्र ईमेल गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलीस आणि सायबर तज्ज्ञ या ई-मेलची चौकशी करत आहेत.