ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अट , नाशिकमधून आवळल्या मुसक्या

ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला मदत केल्या प्रकरणी त्याच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ललितला बंगळुरुमधून पकडले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी बारकाईने तपास करीत त्याच्या मैत्रिणींना बेडय़ा ठोकल्या आहेत. दरम्यान, पुणे पोलीस लवकरच ललित पाटील यालाही संबंधित गुह्यात मुंबई पोलिसांकडून वर्ग करून घेणार आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललित पाटील सातत्याने दोघींच्या संपका&त होता. त्याला हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी दोघींनी मदत केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील मॅफेड्रॉन विक्रीतून मिळणाऱया पैशांतील काही वाटा दोघींवर खर्च करीत होता. तो दोन आठवडे फरार असताना दोघींच्या सतत संपका&त होता. रुग्णालयातून पसार झाल्यानंतर त्याने थेट नाशिक गाठले होते. तेथील त्याच्या निकटवर्तीय महिलेकडे रात्रभर मुक्काम केला. तिच्याकडून 25 लाखांची रोकड घेऊन तो नाशिकमधून बाहेर पडला, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली

श्रीलंकेत पळून जाणार होता

ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललितने नाशिकमधील मैत्रिणींकडून तब्बल 25 लाख रुपये घेतले होते. बंगळुरुतून तो श्रीलंकेत पसार होण्याच्या तयारीत होता. मागील 15 दिवस पुणे पोलिसांची विविध पथके त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करीत होती. ललितने ससून ते चेन्नईपर्यंत प्रवास कसा केला, त्याला आश्रय कोणी दिला, यादृष्टीने तपासाला वेग देण्यात आला आहे. ललितला त्याच्या मैत्रिणींनी पसार होण्यास मदत केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.

नाशिकमध्ये आज शिवसेनेचा ‘इशारा’ मोर्चा

तीर्थक्षेत्र नाशिक हे ड्रग्जसह नशेखोरी, जुगारीचा अड्डा झाले आहे. ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढावी, ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी, 20 ऑक्टोबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘तरुण पिढी वाचवूया, ड्रग्जमुक्त नाशिक करूया’ हे घोषवाक्य घेवून ही चळवळ राबविण्यात येत आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

महाराष्ट्राचा नायजेरिया, केनिया करायचा का

मिंधे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांवर ड्रग्ज प्रकरणात आरोप होत असून, माफियांना पालकमंत्र्यांचेच अभय असल्याचे उघड झाले. यांना महाराष्ट्राचा नायजेरिया, केनिया करायचा आहे का, पंजाबप्रमाणे नाशिकचं उडतं नाशिक करायचं आहे का, असा संतप्त सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
तरुणांच्या भविष्याची चिंता म्हणून

मी ड्रग्जचा मुद्दा मांडतेय – अंधारे

पक्षीय राजकारण म्हणून नाही; पण तरुणांच्या भविष्याची आणि आरोग्याची चिंता करीत मी ड्रग्जचा मुद्दा मांडत आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंड बंद करण्याची भाषा करत असून तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकत असेल तर मी बोलायचं नाही का? एक सामान्य नागरिक म्हणून मी प्रश्न विचारायचे नाही का? असा सवाल करत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले.