महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची साथ पसरली आहे, उद्धव ठाकरे कडाडले

कोरोनाची साथ असताना राज्यात कधीही औषधांचा तुटवडा पडला नव्हता. पण, आता राज्यात दुसरी कुठलीही साथ नसताना औषधांचा तुटवडा पडताना दिसतोय. कारण राज्यात जी साथ पसरली आहे ती भ्रष्टाचाराची आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्ताधारी खोके सरकारवर कडाडले आहेत. मातोश्री येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या मृत्युच्या तांडवावर त्यांनी उद्विग्नता व्यक्त करताना एक फुल दोन हाफ सरकारचा खरपूस समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, आज मात्र मी जरा अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे, तो एवढ्याच साठी की सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत, बारा वाजलेले आहेत. ते बघितल्यानंतर खरोखर संताप येतो. जेव्हा जगभरात कोरोनाचं संकट होतं, तेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी मुख्यमंत्री होतो. आज मी मुख्यमंत्री नाहीये, सरकार महाविकास आघाडीचं नाहीये. महाराष्ट्र तोच आहे, आरोग्य यंत्रणा तीच आहे. पण ज्या आरोग्य यंत्रणेने एक जग व्यापून टाकलेलं संकट, त्या संकटाचा सामना यशस्वीपणाने केला. त्याच महाराष्ट्राची दुर्दशा हे सरकार बदलल्यानंतर चव्हाट्यावर आली आहे. कोरोनाच्या काळात मुंबई मॉडेल असेल, महाराष्ट्र असेल, याच यंत्रणेने, हेच डॉक्टर होते, डीन होते, परिचारिका त्याच होत्या, वॉर्डबॉय तेच होते. यांनी जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली. आणि कोरोनावर इलाज नसतानासुद्धा जी काही औषध वापरली जात होती. ती औषधं अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात सुद्धा पोहोचवण्याचं काम या यंत्रणेने केलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित महाराष्ट्र हा पहिला किंवा एकमेव प्रदेश आहे, राज्य आहे, जिथे दुर्गम भागात ड्रोननेसुद्धा औषध पुरवली होती. मी स्वतः नंदुरबारच्या एका टोकाच्या लसीकरण केंद्रला भेट दिली होती. तिथेसुद्धा लसीकरण झालं होतं. कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता, लसीचा तुटवडा नव्हता. डॉक्टर्स व्यवस्थित होते. अगदी त्यातल्या कोरोना योद्ध्यांचा या संकटात मृत्यू झाला तरी ते कुठेही मागे हटले नाहीत. योद्ध्यासारखे लढले. आणि त्या योद्ध्यांना आज बदनाम केलं जात आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

राज्यातील शासकीय रुग्णालयांतील मृत्युंनंतर त्यावर ठोस पावलं उचलण्याऐवजी दिल्लीवारी करणाऱ्या मिंधेंवरही त्यांनी कडाडून टीका केली. ‘गेले काही दिवस ठाणे, कळवा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड इथली रुग्णालयं आणि अजूनही काही रुग्णालयांमधून बातम्या येत आहेत. याला जबाबदार कोण? मला संताप याच गोष्टीचा आला आहे. एकतर याची जबाबदारी कुणीच घेत नाहीये. हे संकट महाराष्ट्रावर आलंय, तेव्हा मुख्यमंत्री कुठे आहेत. मी ज्या सरकारला एक फुल दोन हाफ म्हणतोय, ते एक फुल दोन हाफ कुठेयत? त्यातले एक फुल आणि एक हाफ दिल्लीत आहेत. दुसरे हाफ कुठे आहेत, त्याची कल्पनाच नाही. मुख्यमंत्र्यांच्या आणि दुसऱ्या हाफ उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं की या ठिकाणी जाऊन तुम्ही नेमकं काय आहे, याचं कारण शोधलं पाहिजे. पण इथे हॉस्पिटलमध्ये बळी जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत बसलेले आहेत. नक्षलवाद्यांचा सामना कसा करायचा, ते एक संकट आहेच. पण, रुग्णालयात जेवढे आज बळी गेलेले आहेत, तेवढे काही वर्षांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेले नाहीत.’

‘नांदेडच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. जो गुन्हेगार असेल, असेलच तर जरूर त्याला शिक्षा द्या. पण नांदेडच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला? कळवा, छ. संभाजीनगर, नागपूर या रुग्णालयांमध्येही बळी गेले आहेत. हा काही योगायोग आहे का, की ज्या डीनला एका मस्तवाल गद्दार आमदाराने संडास साफ करायला लावला. ते आदिवासी आहेत, असं म्हणतात. मी जातपात न पाहता सगळ्यांना एका न्यायाने वागवलं आहे. पण, संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. म्हणून धमकवण्यासाठी त्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला आहे का? औषधांचा तुटवडा हा राज्यभर आहे. मंत्री म्हणताहेत की औषध मुबलक आहेत, पण प्रत्यक्षात खडखडाट आहे. (माध्यम प्रतिनिधींना उद्देशून) तुमच्याच माध्यमांतून आलेल्या या बातम्या आहेत. मग हे नेमके मंत्री कोण आहेत? कारण हे खातं विभागलं गेलं आहे. दुसरीकडे चंद्रपूर इथल्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यांना औषधं लिहून दिली जातात, ती बाहेरून पैसे देऊन विकत आणावी लागतात. मग, पंतप्रधानांच्या ज्या काही योजना आहेत, राज्याच्या ज्या काही योजना आहेत. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून याचा खर्च होणार आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. ती बिलं खरी आहेत, ती मदत कुणाला होतेय, हा संशोधाचा विषय होऊ शकतो. कोरोनाच्या काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. पण, आज राज्यात इतर कुठलीही साथ नसताना औषधांचा तुटवडा आहे. आज दुसरी कोणतीही साथ नाही. साथ आहे ती भष्ट्राचाराची साथ पसरली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे खोके सरकारवर कडाडले.