वडापावच्या तेलावर विमानं उडणार

वडापावच्या तेलावर विमानांचे उड्डाण? थोडे चमत्कारिक वाटेल, पण उमेश वाघधरे या कोकणातील तरुणाने हे खरे करून दाखवलेय.

वडापावच्या गाडय़ांवर, छोटय़ा खानावळी, उपाहारगृहे आणि घराघरातून वापरून झालेले तेल गोळा करून त्यावर प्रक्रिया करायची आणि विमानासाठी वापरात येणाऱया इंधनाची निर्मिती करायची हे अजब स्वप्न उमेश यांनी पाहिले आणि सत्यात उतरवले. आता या प्रयोगाचे जगभरातून स्वागत होत आहे.

खराब तेलापासून इंधन निर्मिती करणारे एरिस बायो एनर्जी हे वाघधरे यांचे स्टार्ट अप अल्पावधीतच नावारूपाला आला. वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलापासून बायोडिझेल तयार करण्याची अद्भुत संकल्पना एरिस बायो एनर्जीने यशस्वी करून दाखवली आहे. वाघधरे यांनी 2018 मध्ये हे स्टार्टअप सुरू केले. एकटय़ा मुंबईतील दहा हजारांहून अधिक भोजनालये आणि किरकोळ दुकानांमधून महिन्याला अंदाजे 25 हजार किलो वापरलेले स्वयंपाकाचे तेल ते गोळा करतात. महाराष्ट्रात वाघधरे यांनी पंपनीने पहिला उत्पादन कारखाना सुरू केला.

पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी

वापरून खराब झालेल्या तेलाचे करायचे काय हा गंभीर प्रश्न होता. काही ठिकाणी हेच तेल पुनः पुन्हा वापरल्याने निकृष्ट दर्जाचे पदार्थ अनेकांच्या मुखी जात होते. हे तब्येतीसाठी हानीकारक होते, पण एरिस बायो एनर्जीने असे तेल विकत घ्यायला सुरुवात केल्याने तेलाच्या पुनर्वापराचे प्रमाण घटले. शिवाय जुन्या तेलाचा इंधनाच्या रूपात पुनर्वापर होत असल्याने ते पर्यावरण पूरक ठरलेय.