धारावीकरांचा निर्धार पक्का, अदानीवर उद्या लाखोंची धडक

मुंबईतील उद्योग-रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र आणि आशिया खंडातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली ‘टीडीआर’ घोटाळा करून ‘अदानी’च्या घशात घालण्याचा ‘मिंधे’ सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी धारावीकर एकवटले आहेत. या लढय़ात शिवसेना भक्कमपणे धारावीकरांच्या पाठीशी उभी ठाकली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार 16 डिसेंबर रोजी ‘अदानी’च्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयावर लाखोंचा सर्वपक्षीय महामोर्चा धडकणार आहे. या मोर्चामुळे सरकारची हातभर टरकली असून पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. मात्र काहीही झाले तरी हा मोर्चा निघणारच, असे आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलिसांना निक्षून सांगितले.

राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्पेशल प्रोजेक्ट जाहीर करूनही धारावीकरांना फक्त 300 फुटांची जागा देण्याचा घाट घातला असून विकासक ‘अदानी’वर मात्र सवलतींचा वर्षाव केला आहे. कोणत्याही हरकती-सूचना न मागवता सरकारने थेट विकासाची हमी घेतली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणचा ‘टीडीआर’ मुंबईत कुठेही वापरण्याची मुभा ‘अदानी’ला दिल्यामुळे इतर विकासकांना पहिल्यांदा ‘टीडीआर’ वापरायचा असेल तर तो अदानीकडून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ‘अदानी’ला मुंबई गिळंकृत करण्यासाठी रान मोकळे मिळणार आहे.

आतापर्यंत धारावीतील केवळ 58 हजार झोपडय़ांचे सर्वेक्षण झाले असून 80 ते 90 हजार झोपडीधारक अजूनही पात्र-अपात्रतेच्या सीमेवर आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहणाऱया भूमिपुत्र हजारो धारावीकरांना या ठिकाणाहून हुसकावून लावण्याचा डाव आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. ‘अदानी’कडून होणाऱया प्रस्तावित पुनर्विकासाबाबत धारावीकरांना कोणतीही रीतसर माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे सरकार आणि अदानीविरोधात धारावीकरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच शिवसेना धारावीकरांच्या हक्कांसाठी हा प्रचंड मोर्चा काढणार आहे.

15 हजार फॅक्टरीज, अडीच लाख रोजगार!
धारावी केवळ आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी नाही तर मुंबईतले उद्योग आणि रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र आहे. तब्बल पाच हजार उद्योग, 15 हजार छोटय़ा-मोठय़ा फॅक्टरीज, अडीच लाख लोकांना रोजगार देणारी आणि देश-विदेशातील अनेक उद्योगांना कच्च्या मालासह तयार वस्तू पुरवणारी मुंबईचे आर्थिक पेंद्र आहे. त्यामुळे धारावी म्हणजे मुंबईला आर्थिक पाठबळ देणारे इंधनच आहे. धारावीचे असे महत्त्व सांगणारा टिझर शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. याला मुंबईभरात तुफान प्रतिसाद मिळत असून शिवसेनेच्या मोर्चाची जोरदार चर्चा सुरू आहे.

धारावी विकासकाला गिळू देणार नाही!
चामडय़ाच्या वस्तू, दागिने, विविध उपकरणे, कापड इत्यादी गोष्टी धारावीतून जगभरात निर्यात केल्या जातात. अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये अनेक बाजारपेठा प्रामुख्याने धारावीतील उत्पादनावर चालतात.दरवर्षी जवळपास 5400 ते 8300 कोटींची उलाढाल धारावीतून होते. त्यामुळे परदेशातील अनेक बाजारपेठाही धारावीवर अवलंबून आहेत. अशी धारावी विकासकाच्या घशात घालू देणार नाही, असा निर्धार शिवसेना आणि धारावीकरांनी केला आहे.मोर्चासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. धारावीच्या चौकाचौकांत 300हून जास्त सभा झाल्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

अशा आहेत मागण्या
1.धारावीतील सर्व निवासी, अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा.

2.निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचे घर मोफत द्या. ‘टीडीआर’साठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी.

3.पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचे घर मोफत द्या.

4.‘अदानी’ हा विश्वासार्ह विकासक नसल्याची जनभावना असल्याने म्हाडा, सिडको प्राधिकरणाकडून ‘बीडीडी’च्या धर्तीवर पुनर्विकास करा.

5.नव्याने सर्वेक्षण करा. निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करावा.

6.प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लान आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या.

7.शाहूनगर लेबर कॅम्पमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांची जागा द्या.

शिष्टमंडळाची पोलीस उपायुक्तांसोबत चर्चा
1.मोर्चाला परवानगी देण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत आहेत. शिवसेनेने मोर्चाला परवानगी मिळावी म्हणून धारावी पोलीस स्टेशन तसेच पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांना अर्ज दिला. मात्र ही परवानगी आमच्या हातात नाही, असे सांगत आयुक्तांकडे अर्ज करण्यास त्यांनी सांगितले. त्यानुसार आज आयुक्तांकडे अर्ज केला आहे.
2.सायंकाळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, शिवसेना दक्षिण मध्य मुंबईचे निरीक्षक बाबुराव माने, विभागप्रमुख महेश सावंत, धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शेकापचे मुंबई अध्यक्ष राजू कोरडे यांच्या शिष्टमंडळाने मनोज पाटील यांची भेट घेतली व चर्चा केली.
3.धारावीकरांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध हा मोर्चा आहे. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा निघणार आहे, असे शिष्टमंडळाने पोलिसांना सांगितले. या वेळी वाहतूककोंडीचे कारण पोलिसांकडून पुढे करण्यात आले. मात्र काहीही झाले तरी हा मोर्चा निघणार असून पोलिसांनी मोर्चाला परवानगी द्यावी, असे शिष्टमंडळाने निक्षून सांगितले.

15 पक्ष, संस्था, संघटना सहभागी होणार
शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर), आझाद समाज पार्टी, सर्व समाज जनता पार्टी असे पंधराहून अधिक पक्ष तसेच धारावी भाडेकरू महासंघ आणि धारावीत सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, चाळ कमिटय़ा, संस्था, संघटना, मंडळे मोर्चात सहभागी होणार आहेत.