अमेरिकेत पूल कोसळल्याचा हिंदुस्थानालाही फटका, होऊ शकते कोट्यवधींचे नुकसान

कंटेनर जहाजाच्या धडकेने अमेरिकेच्या बाल्टीमोर येथे पूल कोसळल्याची नुकतीच घटना घडली आहे. जहाजाच्या धडकेने पत्त्यासारखा कोसळलेल्या या पुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा पूल पटप्सको नदीत कोसळला आणि त्यासोबत त्यावरुन जाणाऱ्या अनेक गाड्या नदीत पडल्या. हा पूल तुटल्याने अनेक महिने अमेरिकेसह अन्य देशांना त्याचा फटका बसू शकतो. या भयंकर दूर्घटनेमुळे त्या मार्गाने जाणाऱ्या अनेक जहाजांना रोखण्यात आल्याने हिंदुस्थानालाही कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते.

बाल्टीमोर येथे जी भयंकर पूल दूर्घटना घडली त्यावेळी पुलावर अनेक गाड्या होत्या. ज्या नदीत पडल्या. तसेच या नदीत 25 लाख टन कोळसा आणि फोर्ड मोटार तसेच जनरल मोटरपासून बनवण्यात आलेल्या शेकडो कार नदीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यासाठी हिंदुस्थानासाठी अमेरिकेतून कोळसा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, बाल्टीमोर येथे पुल कोसळल्यामुळे न्यू जर्सी आणि व्हर्जिनियाच्या बंदरावरचा दबाव वाढू शकतो. बाल्टीमोर अमेरिकेतील महत्त्वाचे आणि व्यस्त बंदर आहे. हे कार आणि हलके ट्रक बनवणाऱ्या युरोपियन कंपन्यांसाठी महत्त्वाचे बंदर आहे. या बंदराभोवती मर्सिडीज, फोक्सवॅगन आणि बीएमडब्ल्यूच्या सुविधा आहेत. याचबरोबर बाल्टीमोर अमेरिकेकडून कोळसा निर्यातीचे दुसरे मोठे टर्मिनल आहे. त्यामुळे याचा हिंदुस्थानच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. हिंदुस्थानच्या कोळसा आयातीत अमेरिकेचा 6 टक्के वाटा आहे. हिंदुस्थानात सर्व कोळशाची निर्यात ही अमेरिकेच्या बाल्टीमोर येथून होते. हिंदुस्थानात कोळशाचा वार्षिक वापर 1000 दशलक्ष टन आहे ज्यापैकी 240 दशलक्ष टन कोळसा आयात केला जातो. त्यामुळे बाल्टीमोर येथील पुल दुर्घेटनेमुळे हिंदुस्थानाला कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते.

या अपघातानंतर जवळपास 12 जहाजं बाल्टीमोर येथे अडकली आहेत. यामध्ये कार्गो शिप, ऑटोमोबाईल कॅरिअर आणि एक टॅंकरचाही समावेश आहे. सोबत तिथे टगबोटही अडकल्या आहेत. ही तर बाल्टीमोर बंदराची अवस्था आहे. रोज 35 हजार लोकं या पुलाचा वापर करतात. यावरून दरवर्षी 28 अरब डॉलर सामान तिथून जाते. हा पूल बनवण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला आणि हा पुल 1977 साली पूर्ण झाला. त्याची किंमत सुमारे 141 दशलक्ष डॉलर्स होती.त्यामुळे बाल्टीमोर बंदरावरील कामकाज सुरळीत होण्यासाठी अनेक महिने जातील. तर या पुलाचे कामकाज करण्यासाठी अमेरिका मीडिया वृत्तनुसार 600 दशलक्ष डॉलरचा खर्च येऊ शकतो.