तोयबाच्या उझैर खानचा खात्मा, सात दिवसांपासून असलेली चकमक थांबली

जम्मू-काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यात सात दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत धुमश्चक्री सुरू होती. यादरम्यान हिंदुस्थानचे ४ जवान शहीद झाले असून, त्या बदल्यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या शोधमोहिमेत लष्कर-ए-तोयबाच्या उझेर खानचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. सुरक्षा दलाने ठार केलेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानच्या लष्कराने दहशतवाद्यांना साथ दिल्याचे समोर आले आहे. सात दिवसांपासून सुरू असलेली ही चकमक थांबली. आतापर्यंत अनंतनागमध्ये १. बारामुल्लामध्ये ३ आणि राजौरीमध्ये २ अशा एकूण ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

जम्मू-कश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, आम्हाला कोरेरनागमध्ये गदुलच्या जंगलात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षादलाने कसून शोधमोहीम राबवीत गोळीबार केला. यामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लश्कर ए तोयबाचा उझरचा मृतदेह सापडला असून, त्यासोबत एका दहशतवाद्याचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी जंगलातून दोन मृतदेह बाहेर काढले होते.

कश्मीरमधील आतापर्यंत सर्वात मोठी चकमक

जम्मू-कश्मीरमध्ये आठवडाभरापासून सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू होती. यामध्ये कश्मीर भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून, कश्मीरमधील ही तिसरी सर्वात दीर्घ चकमक आहे. १३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईला १९ सप्टेंबपर्यंत १५० तास उलटून गेले होते.. हे ऑपरेशन लवकरात लवकर संपविण्यासाठी अनंतनागमध्ये पॅरा कमांडो आणि सुरक्षा दलाच्या आणखी १० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. एडीजीपी विजय कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी चकमकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत.

किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांना जिवंत पकडले

श्रीनगर: जम्मू-काश्मिरात आगामी काळात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या गोटात चिंता पसरली असून, चकमकी घडविण्याचा कट सुरू आहे. यादरम्यान सप्टेंबर महिन्यात मोठ्या कारवायांचा कट सुरक्षा दलांनी उधळून लावला. किश्तवाड जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना जिवंत पकडले आहे. तौसिफ -उल-नबी, जहूर-उल-हसन आणि रियाझ अहमद अशी त्यांची नावे आहेत. तिघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. ७० किलो वजनाच्या ५६० जिलेटिनच्या काड्या, रस्ता बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटक सामग्री आदी शस्त्रसाठा ताब्यात घेतला आहे.