ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी यांचे निधन

‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकात गोप्याची भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी (66) यांचे मंगळवारी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुलुंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात मुलगा आणि सून असा परिवार आहे. लवराज कांबळी यांनी अनेक मालवणी नाटकांत काम केले तसेच स्वतःच्या निर्मिती संस्थेद्वारे मालवणी नाटकांची निर्मिती केली. मालवणी भाषेचा गोडवा त्यांनी महाराष्ट्रभर पोहचवला.

लवराज कांबळी यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनच्या अनेक नाटकांत काम केले. ‘वस्त्रहरण’, ‘केला तुका झाला माका’, ‘येवा कोकण आपलाच आसा’, ‘वडाची साल पिंपळाक’, ‘करतलो तो भोगतलो’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘चंपू खानावळीण’, ‘चाकरमानी’ अशा अनेक नाटकांत त्यांनी अभिनय केला. त्यांच्या पत्नी गीतांजली कांबळी यादेखील अभिनेत्री होत्या. कांबळी यांच्या गीतांजली प्रोडक्शनने अनेक मालवणी नाटके रंगभूमीवर आणली.