विराट कोहली बनला ‘वॉटर बॉय’, ड्रिंक्स ब्रेकमध्ये कुलदीप-शार्दुलसाठी घेऊन आला पाण्याच्या बाटल्या

हिंदुस्थानचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपल्या सहकारी खेळाडूंसाठी मैदानावर पाणी घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिज मधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील आहे. या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असूनही आपल्या संघासाठी योगदान देताना दिसला. विराट कोहलच्या या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता मालिकेतील निर्णायक सामना 1 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल आणि त्या सामन्यात किंग कोहली पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये परतेल अशी अपेक्षा आहे.

विराट कोहली ‘वॉटर बॉय’ बनल्याचा हा व्हिडिओ डावाच्या 38व्या षटकातील आहे. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान विराट कोहलीसह युझवेंद्र चहलने फलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूरसाठी बाटल्यांमध्ये पाणी आणले. त्यावेळी हिंदुस्थानची धावसंख्या 7 गडी गमावून 167 धावा अशी होती.

बार्बाडोस वनडेत टीम इंडियाच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अनुपस्थिती असल्याचे बोलले जात आहे. युवा खेळाडूंना आजमावण्यासाठी या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात टीम इंडियाला रोहित शर्माच्या कर्णधारपदासह मधल्या फळीत विराट कोहलीच्या अनुभवाची कमतरता जाणवली. त्याचबरोबर कमी धावसंख्येच्या या सामन्यात रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या निर्भय निर्णयांचाही अभाव दिसून आला.