विराटची माघार; रोहितबाबत साशंकता, हिंदुस्थानचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून

मायदेशात झालेल्या वन डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वर्ल्ड कपनंतर लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू झालेल्या टी-20 मालिकेसाठी ‘टीम इंडिया’च्या बहुतांश सीनियर्स खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर हिंदुस्थानी संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर टी-20 आणि वन डे मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. मात्र विराट कोहलीने या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. शिवाय कर्णधार रोहित शर्माचाही या दौऱ्यात खेळणे संदिग्ध मानले जात आहे.

हिंदुस्थानचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेट दौऱ्यातून विराट कोहलीने माघार घेतली असून टी-20 क्रिकेटमध्ये यापुढे खेळायचे की नाही, यावरही तो गंभीरपणे विचार करत आहे. मात्र वन डे मालिकेतून त्याने माघार घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या दौऱ्यात तो कसोटी मालिकेसाठी टीम इंडियासाठी उपलब्ध असेल. क्रिकेटच्या टी-20 प्रकारातून कोहली निवृत्त होण्याचा विचार करत असला तरी आगामी टी-20 वर्ल्ड कप सहा महिन्यांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे कोहलीचा सुपर फॉर्म बघता त्याची टी-20 मालिकेतून माघारसुद्धा खटकत आहे.

कर्णधार रोहित शर्माही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे मालिकेत खेळणार की नाही, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. टी-20 मालिकेतून त्याची माघार घेण्याची शक्यता अधिक असली तरी ‘बीसीसीआय’कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर काही दिवसांत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी ‘टीम इंडिया’ची निवड करतील तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. रोहित शर्मा सध्या इंग्लंडमध्ये कुटुंबासह सहलीवर आहे, तर विराट कोहलीही लंडनमध्ये सुट्टय़ांचा आनंद उपभोगतोय.

विराटचा टी-20 अन् वन डेतून निवृत्तीचा विचार

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेआधी विराट कोहली पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. कोहलीने बीसीसीआयला याबाबत कळवले असल्याचेही वृत्त आहे, मात्र त्याचा जबरदस्त फिटनेस आणि सध्याचा सुपर फॉर्म बघता कोहली इतक्यात निवृत्त होईल, असे वाटत नाही.