तळहिरा तलाव विहिरीतून भागणार देऊरकरांची तहान

राज्यातील अनेक गावांत दुष्काळी परिस्थिती तीव्र होत आहे. कोरेगाव तालुक्यातील उत्तर भाग हा कायमच दुष्काळी असलेला भाग. या भागात सध्या 80 रुपये बॅरलप्रमाणे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. या भागातील सर्वच पाझर तलाव सध्या कोरडे पडले आहेत. त्यामुळे सर्व गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अशी परिस्थिती असताना देऊर ग्रामपंचायतीने 2016 पासून रखडलेल्या तळहिरा पाझर तलावात असलेल्या विहिरीचे काम पूर्ण करत गावासाठी पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ केल्याने देऊरकरांची तहान भागण्यास मदत होणार आहे.

आज सकाळी माजी जि.प. सदस्य राहुल कदम यांच्या उपस्थितीत देऊरचे सरपंच श्यामराव कदम, सदस्य विकास कदम, माजी उपसरपंच ज्ञानदेव कदम, सुनील चव्हाण, उमेश देशमुख, सुरेश जाधव, ऍड. प्रसाद सुतार, ग्रामपंचायत सदस्या चव्हाण, प्रकाश देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी तळहिरा तलावातील विहिरीतल्या पाण्याचे पूजन करण्यात आले.

राहुल कदम म्हणाले, 2014 पासून देऊर गावच्या पाण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा योजना असावी यासाठी प्रयत्न झाला. मात्र, तळहिरा तलावातून विहीर खोदून गावासाठी पाणीपुरवठा व्हावा, असा आग्रह ग्रामस्थांनी सुरू केल्यामुळे या पाणी योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला. यासाठी तत्कालीन पालकमंत्री शिवतारे, पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी मदत केली. मात्र, तलावात असलेल्या पाण्यामुळे हे काम रखडत गेले. सध्या गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने तळहिरा तलावात असलेल्या विहिरीचे काम पूर्ण करत यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. थोडय़ाच दिवसांत या पाण्याचे टेस्टिंग करून पाणी पिण्यासाठी वापरता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.