यंदा जूनमध्येच बरसणार सरीवर सरी; IMD चा मॉन्सूनचा आशादायक अंदाज

पावसाने गेल्या वर्षी मोठी ओढ दिल्याने या वर्षात राज्यात भीषण पाणीटंचाई जाणावत आहे. राज्यातील जवळपास सर्वच धरणात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत हे पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच अनेक जिल्ह्यात विहिरींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याकडून दिलासादायक आणि आशादायक माहिती मिळाली आहे.

देशाच्या हवामान खात्याने (आयएमडी) येत्या वर्षातील मॉन्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा मॉन्सूनचे प्रमाण सरासरीएवढे राहणार आहे. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा मॉन्सून सरासरीएवढा राहणार असून 8 जूनलाच वरुणराजाचे आगाम होण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईची समस्या असलेल्या महाराष्ट्राला आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

यंदा सामान्यहून अधिक पाऊसाचा अंदाज आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 8 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हवामनावर अल निनोचा प्रभाव होता. त्यामुळे मॉन्सूनने जून महिन्याच्या अखेरीपर्यंत वाट बघायला लावली. तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली. मात्र, यंदा अल निनोची प्रभाव कमी असून पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपणार आहे. त्यामुळे यंदा देशात सरासरीएवढा पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघून शेतीची आणि कोणते पीक घ्यायचे, याची तयारी करतात. आता हवामान विभागाचा अंदाज जाहीर झाला आहे. हा अंदाज दिलासादायक आणि आशादायक असल्याने बळीराजा सुखावला आहे. भारतीय हवामान विभागाकडून यंदाच्या मॉन्सूनबाबत पहिला दिर्घकालीन अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनबाबतचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. मात्र, आताच्या या अंदाजाने दिलासा मिळाला आहे.