चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच लोकलची धाव

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी चर्चगेट स्थानक येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या काही लोकल मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंतच चालवण्यात आल्या. गाडय़ा मुंबई सेंट्रलच्या पुढे जातच नसल्याने ग्रॅण्ट रोड, मरीन लाईन्स, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱया प्रवाशांना ट्रकमधून पायपीट करत कार्यालय गाठावे लागले. गर्दीच्या वेळी झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी सुरळीत सुरू असतानाच 8.50 च्या सुमारास चर्चगेट स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे अप दिशेकडे येणारी लोकल सेवा खोळंबली. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱया काही लोकल गाडय़ा चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येत होत्या. दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाडानंतर रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत 9.22 च्या सुमारास बिघाड पूर्ववत केला. त्यामुळे लोकल सेवा सुरळीत झाली, मात्र त्यानंतरही लोकल विलंबाने धावत होत्या. पश्चिम रेल्वे मार्गावर वारंवार तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा होत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते.