नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; 75 टक्के पेरणी, खरीप पिकांना जीवदान

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिह्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, बाजरी, भुईमूग, वाटाणा, कपाशी या पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही जिह्यात दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. अद्यापि जिह्यातील पेरणी 75 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली असून, खरिपासाठी पेरणी करण्याचा कालावधी दोन दिवसांनी संपणार आहे.

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱया पंधरवडय़ात काही प्रमाणात जिह्यात पावसाला सुरुवात झाली. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होताना दिसत आहे. जिह्यात आतापर्यंत 75 टक्क्यांच्या जवळपास पेरण्या झाल्या असून, यात ऊस लागवड सोडून झालेल्या पिकांच्या पेरणीची टक्केवारी ही 84.75 टक्के आहे. जिह्यात आतापर्यंत चार लाख 91 हजार क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात अकोले तालुक्यात दोन हजार 940 हेक्टर (17 टक्के) भाताची लागवड, खरीप ज्वारी 35 हजार हेक्टर (6 टक्के), बाजरी 60 हजार 18 हेक्टर (40 टक्के), मका 56 हजार 868 हेक्टर (94 टक्के), तूर 45 हजार 637 हेक्टर (126 टक्के), 16 हजार 127 हेक्टर (34 टक्के), उडीद 35 हजार 27 हेक्टर (87 टक्के), भुईमूग तीन हजार 955 हेक्टर (51.72 टक्के), तीळ 59.5 हेक्टर (42.62 टक्के), सूर्यफूल 197 हेक्टर (38 टक्के), सोयाबीन एक लाख 34 हजार 911 हेक्टर (154.48 टक्के), कापूस एक लाख 31 हजार 247 हेक्टर (107 टक्के) अशी लागवड झालेली आहे. यांसह 13 हजार 915 हेक्टर नवीन उसाची लागवड झालेली असून, त्याची टक्केवारी 14.7 टक्के आहे.